बदलापूर : मागील काही वर्षांपासून अतिवृष्टी झाल्यास बदलापूर शहराला पुराचा तडाखा बसतो. त्यामुळे बदलापूर शहरात पूरपरिस्थितीला कारणीभूत ठरणाऱ्या नाल्यांच्या सफाईचे काम कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने हाती घेतले आहे. शहरातील १३ मोठ्या नाल्यांसहित इतर गटारे व नाल्यांच्या सफाईचे काम सुरू केल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकारी श्रेया शिरवटकर यांनी दिली आहे.
पावसाळा आणि बदलापूर शहराचे जणू जुने समीकरण आहे. २००५ मध्ये आलेल्या महापुरानंतर, २०१८, २०१९ मध्येही पूरपरिस्थिती निर्माण झाली होती; मात्र प्रत्येक वर्षीच बदलापूर शहरातील पश्चिमेकडील अनेक सखल भागांत जास्त पाऊस पडल्यास पाणी साचते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी पालिकेने नालेसफाईचे काम पूर्ण करणे अपेक्षित असते. यंदा लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमात पालिकेचा सगळा कर्मचारी वर्ग व्यस्त असल्याने नालेसफाईच्या कामाला उशिरा सुरुवात झाली आहे. मात्र तरीही निवडणुकीची कामे पूर्ण करत शहरातील नालेसफाईला आठवडाभरापूर्वी सुरुवात करण्यात आली आहे.
बदलापूर पूर्व येथील शिरगाव गावातून पुढे आपटेवाडी, कात्रप, स्टेशन परिसर व पुढे पश्चिमेला शनिनगर, हेंद्रेपाडा इथून निघणारा हा नाला उल्हास नदीला जाऊन मिळतो. या नाल्याची सफाई करण्यात येत आहे. तसेच शहरात एकूण १३ मोठ्या नाल्यांच्या सफाईला सुरुवात करण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडे असणाऱ्या जेसीबी व पोकलेनच्या साह्याने नालेसफाईला सुरुवात केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. साधारण शहरातील संपूर्ण नालेसफाई ३१ मे पूर्वी पूर्ण होईल, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकारी श्रेया शिरवटकर यांनी दिली आहे.
