पाऊस उंबरठ्यावर असल्याने पाणी कपातीची शक्यता नाही
कल्याण : मागील काही दिवसांपासून उष्णतेमध्ये वाढ झाली आहे. मुंबई, ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याचे अधिक प्रमाणात बाष्पीभवन होऊन, धरणाच्या पातळींमध्ये घट होत आहे. ठाणे, मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्यात आता कपात केली जाते की काय या विचाराने नागरिक चिंतातूर असताना जलसंपदा विभागाने अशाप्रकारची कोणतीही कपात करण्याचा निर्णय नाही, असे स्पष्ट केले आहे.
एप्रिल ते मे महिन्यात उष्णता वाढली की त्याचा परिणाम धरणांतील पाणी साठ्यावर सर्वाधिक होतो. या पाण्याचे बाष्पीभवन होऊन धरणातील पाण्याच्या पातळीत घट होत जात होते. त्याचा परिणाम मुंबई, ठाणे शहर परिसराला करण्यात येणाऱ्या दैनंदिन पाणी पुरवठ्यावर होतो. मागील पाच ते सहा वर्षापूर्वी जून, जुलै सरला तरी पावसाने ओढ दिल्याने धरण साठा तळाला गेला होता. नागरिकांना दैनंदिन पाणी पुरवठा कसा करायचा असा प्रश्न शासनासमोर निर्माण झाला होता. त्यानंतर शासनाने दरवर्षी दिवाळीनंतर पाऊस पडेपर्यंत आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय यापूर्वी घेतला होता. यामुळे जून अखेरपर्यंत पुरेसा पाणी साठा पिण्यासाठी उपलब्ध होत होता.
गेल्या दोन ते तीन वर्षापासून ठाणे जिल्ह्यातील भातसा, वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, बारवी या धरणांमध्ये ऑगस्ट, सप्टेंंबरमध्ये १४ लाख ५० हजार दशलक्ष लिटर पाणी साठा पावसाच्या माध्यमातून जमा होतो. गेल्या दोन महिन्यापासून तापमान ४० अंशाच्या पुढे जात आहे. उष्णतामानामुळे धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन अधिक प्रमाणात होते. मुंबई, ठाणे शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्यात कपात केली जाते की काय अशी चिंता नागरिकांमध्ये आहे. जलसंपदा विभागाने अशाप्रकारची कपात होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
पाणी साठा ४० टक्क्यांवर
मुंबईला दैनंदिन सुमारे साडेतीन हजार तर बारवी धरणातून दैनंदिन सुमारे अकराशेहून अधिक दशलक्ष लिटर पाणी पुरवठा मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर निवासी क्षेत्र, औद्योगिक विभागाला केला जातो. आता हा धरणांचा पाणी साठा सुमारे ३५ ते ४० टक्क्यांवर आला आहे. मागील दोन ते तीन वर्ष समाधानकारक पाऊस पडून ठाणे जिल्ह्यातील धरणे ऑगस्ट, सप्टेंंबरपर्यंत शहरांना आठ महिने दैनंदिन पुरेसा पाणी पुरवठा करतील अशा प्रमाणात भरतात. यापूर्वीसारखी पाणी कपातीची वेळ शासनावर येत नाही.
भातसा धरणाची पाणी साठवण क्षमंता ३२४ दशलक्ष घनमीटर, तानसा ४८ दशलक्ष घनमीटर, मोडकसागर २६ दशलक्ष घनमीटर, बारवी १२१ दशलक्ष घनमीटर, मध्य वैतरणा २२ दशलक्ष घनमीटर आहे. या धरणांमध्ये सद्य परिस्थितीत सुमारे ३५ ते ४० टक्के पाणी साठा आहे. हा साठा पाऊस पडेपर्यंत पुरेसा असल्याचा दावा जलसंपदा, लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांंकडून करण्यात आला आहे.