मुंबई : तापमानाचा पारा वाढणार असून पुढील काही दिवस मुंबईकरांसाठी उष्ण, दमट आणि अस्वस्थ करणारे आहेत. मेअखेरीस पावसाचे पुनरागमन होत असून त्याचाच हा परिणाम असल्याचे हवामान अभ्यासक ऋषिकेश आग्रे यांनी सांगितले. यामुळे मुंबईमध्ये प्री-मान्सून सरी बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सांताक्रूझ येथे ३४.९; तर कुलाबा येथे ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली; तर आर्द्रता सुमारे ६५ ते ७० टक्क्यांच्या आसपास नोंदवली गेली. यामुळे मुंबईत सध्या दमट वातावरणाचा सामना करावा लागत आहे. पुढील आठवड्यात यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार, सध्या सकाळच्या वेळी आकाश अंशतः ढगाळ आणि दुपार व संध्याकाळपर्यंत आकाश निरभ्र राहील. शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५ अंश सेल्सिअस आणि २९ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *