अयोध्येत रामजन्मभूमी मंदिर बांधले गेल्यापासून यात्रेकरूंची संख्या कमी झालेली नाही. यापूर्वी उज्जैनमधील महाकाल लोक आणि बनारसमधील काशी विश्वनाथ कॉरिडॉरने या शहरांमधील पर्यटन आणि हॉटेल उद्योगाला नवसंजीवनी दिली आहे. कोविडदरम्यान आतिथ्य क्षेत्राला सर्वाधिक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले. ही परिस्थिती आता हळूहळू सुधारत आहे. कोविडयुगातील मंदीचा प्रभाव हॉटेल आणि पर्यटनक्षेत्रात नाहीसा होत आहे. या काळात या क्षेत्रात भयंकर टाळेबंदी होते, आता ते रोजगारनिर्मितीचे यंत्र बनत आहे. येत्या १२ ते १८ महिन्यांमध्ये या क्षेत्रात दोन लाखांपर्यंत नोकर्या निर्माण होण्याची शक्यता आहे. हॉटेल्सचा विस्तारही होत आहे. अलीकडेच अयोध्या हे उत्तर प्रदेशमधील सर्वात मोठे पर्यटन केंद्र म्हणून उदयास आले. त्यामुळे येथे अनेक हॉटेल्सचा विस्तार झाला आहे. आयटीसी ते लेमन ट्री आणि टाटा ग्रुपचे ताज हॉटेल येथे गुंतवणूक करत आहेत. अशा परिस्थितीत, येथे हॉटेल ऑपरेशन्स नोकर्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अशी स्थिती केवळ अयोध्येमध्येच नाही तर, देशाच्या विविध भागांमध्ये आहे.
मध्य प्रदेशमधील उज्जैन प्रसिध्द तीर्थक्षेत्र असून उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेचा विशेष दबदबा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या सर्व ठिकाणांचा प्रवास वाढला आहे. त्यामुळे हॉटेल आणि पर्यटन क्षेत्रात नोकर्या वाढत आहेत. ‘टीमलीज सर्व्हिसेस’ या ‘स्टाफिंग सर्व्हिस कंपनीच्या अहवालानुसार पुढील १२ ते १८ महिन्यांमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट आणि पर्यटन क्षेत्रात दोन लाखांहून अधिक नोकर्या निर्माण होतील. यामध्येही सुमारे एक लाख रोजगार केवळ हॉटेल उद्योगात निर्माण होणार आहेत. हॉटेल इंडस्ट्री आपल्या कर्मचार्यांची संख्या वाढवत असल्याचे अहवालात म्हटले आहे. हॉटेल कंपन्या नवीन बाजारपेठेत प्रवेश करत असल्यामुळे हॉटेल रूमची संख्या वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रात नोकर्या वाढत आहेत. भारतात मे ते जुलै महिन्याच्या सुरुवातीपर्यंत शाळा-कॉलेजला सुमारे दोन महिन्यांच्या सुट्या असतात. अशा स्थितीत कौटुंबिक प्रवासाची वर्दळ असते. हा पर्यटनक्षेत्रातील पीक सीझन आहे. या कालावधीत नोकरी शोधणार्यांच्या संख्येत २० ते ३० टक्कयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
