बदलापूर : पावसाळा सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत; मात्र अंबरनाथ शहरातील नालेसफाई झालेली नाही. नालेसफाई न झाल्याने अतिवृष्टी झाली, तर नाले तुडुंब भरून वाहतात, अनेकदा सखल भागात पूर परिस्थिती निर्माण होते; मात्र तरीही अंबरनाथ शहरात पालिकेकडून नालेसफाईचा मुहूर्त अजूनही लागलेला नाही. त्यामुळे पावसाळा तोंडावर असताना शहरात नालेसफाई कधी होणार, असा सवाल अंबरनाथकर विचारत आहेत.
अंबरनाथ शहरात एकूण सहा ते सात मोठे व त्यांना जोडणारे छोटे असे अनेक नाले आहेत. मुख्य म्हणजे स्टेशन परिसरात, मोरिवली नाका येथील नाला, इंदिरा भवन कार्यालय परिसर अशा भागात मोठे नाले आहेत. त्यातच शहराची वाढती लोकसंख्या व अनेक औद्योगिक कंपन्यांमुळे मोठ्या प्रमाणात सांडपाणी या नाल्यांत सोडले जाते. सांडपाण्यासह कचरा, प्लास्टिक, मांसविक्रेते उरलेली घाण ही नाल्यात टाकतात. त्यामुळे या नाल्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास जाणवत आहे; तर यामुळे डासांचा प्रादुर्भावदेखील वाढलेला आहे. त्यात आता पावसाळा तोंडावर आला असताना नाल्याची सफाई करणे, नाल्याचा प्रवाह सुरळीत करण्याची जबाबदारी पालिकेची आहे; मात्र पालिकेकडून नालेसफाईला सुरुवात झालेली नाही.
