मुंबई : क्रेडिट कार्ड सायबर फसवणुकीतील १०० टक्के रक्कम वाचवण्यात बोरिवली येथील एमएचबी पोलिसांना यश आले. तक्रारदाराने याप्रकरणी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतल्यामुळे ही रक्कम वाचवण्यात यश आले. बोरिवलीत वास्तव्यास असलेल्या तक्रारदारांना काही दिवसांपूर्वीच एका अज्ञात व्यक्तीने दूरध्वनी केला होता.

आपण बँकेतील अधिकारी असल्याची बतावणी करून त्याने तक्रारदरांचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड पॉईट रिडीम करण्याचा बहाणा करून त्याने त्यांच्या कार्डची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. ही माहिती घेतल्यानंतर त्याने त्यांच्या कार्डवरून १ लाख ४५ हजार रुपयांचे ऑनलाईन व्यवहार केला. ही रक्कम बँक खात्यातून हस्तांतरित झाल्याचा संदेश येताच त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तात्काळ सायबर पोलीस पोर्टलवर तक्रार केली. तसेच एमएचबी पोलिसांनाही याबाबतची माहिती दिली.

त्यानंतर एमएचबी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश किरपेकर व त्यांच्या पथकाने याप्रकरणी तात्काळ बँकेकडून या व्यवहारांची माहिती घेतली. तसेच रक्कम हस्तांतरित झालेल्या बँकेच्या नोडल अधिकाऱ्याशी संपर्क साधून बँक खात्यातील व्यवहार थांबवले. त्यानंतर बँक खात्यातील व्यवहार थांबवून ही रक्कम गोठवण्यात आली. आता ही रक्कम पुन्हा तक्रारदाराच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *