मुंबई : डिजिटल इंडियाअंतर्गत मोठ्या थाटामाटात रेल्वे स्थानकावर मोफत वायफाय सेवा सुरू करण्यात आली होती. आता मुंबईच्या बहुतांश उपनगरी स्थानकांमध्ये मोफत वायफाय सुविधा डिस्कनेक्ट झाल्याची माहिती समोर आली आहे. बोरिवली, मुंबई सेंट्रल, दादरसहीत काही रेल्वे स्थानकावर वायफाय मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
सध्याच्या जमान्यात इंटरनेटविना राहणे थोडे कठीण आहे. त्यामुळे अनेक शासकीय, खासगी कंपन्यांत वायफाय मोफत पुरवण्यात येते. गुगल इंडियाच्या सहकार्यातून रेलटेल या भारतीय रेल्वेच्या उपकंपनीने २०१६ मध्ये मुंबईच्या उपनगरीय लोकल रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सुविधा सुरू केली. या सुविधेमुळे ट्रेनची वाट पाहणाऱ्या प्रवाशांचे इंटरनेटद्वारे मनोरंजन होईल. तसेच इतर इंटरनेटच्या मदतीने करण्याची कामे शक्य होतील, असा या मागचा हेतू होता. सध्या मुंबईच्या कोणत्याही लोकल स्टेशन किंवा रेल्वे टर्मिनसवर रेल्वेचे वायफाय कुठेही कनेक्ट होत नाही. मुंबई सेंट्रल टर्मिनससह अशी काही स्थानके आहेत जिथे मोबाईल वायफाय उघडल्यानंतरही रेल्वेची लिंक उघडत नाही. त्यामुळे मोफत वायफाय गेले कुठे, असा प्रश्न प्रवाशांमधून विचारला जात आहे.
सर्वप्रथम मुंबई सेंट्रल स्टेशनवर मोफत वायफाय सेवा सुरू करण्यात आली होती. सुरुवातीची काही वर्षे रेल्वेचे वायफाय चांगले चालत होते. स्टेशनवर पोहोचताच प्रवासी रेल्वे वायफाय कनेक्ट करायचे व इंटरनेट वापरायचे. आता मुंबई सेंट्रल स्टेशनवर वायफायवरही रेल्वेची लिंकच दिसत नाही.
