विरार, ता. २३ (बातमीदार) : विरार ते अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील ११ पॅकेजमधील कामांसाठी सात कंपन्यांनी निविदा जिंकली आहे. मुंबई रस्ते विकास महामंडळातर्फे नुकतीच सात स्थापत्य अभियांत्रिकी कंपन्यांना सर्वात कमी बोलीदार म्हणून घोषित करण्यात आले.

विरार ते अलिबागदरम्यान १२८ किमीचा बहुउद्देशीय वाहतूक मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) उभारणार आहे. मुंबईतील प्रवेश नियंत्रित असा हा पहिलाच महामार्ग असणार आहे. या मार्गाच्या मधोमध १३६ किमी लांबीची मेट्रो मार्गिका उभारण्याचेही प्रस्तावित आहे. पहिला टप्पा नवघर-बाळवलीला रायगड, ठाणे आणि पालघर या तीन जिल्ह्यांमधून जोडेल. त्याचे काम ११ बांधकाम पॅकेजेसअंतर्गत केले जाईल. पहिल्या टप्प्यात वसईतील राष्ट्रीय महामार्ग आठवरील नवघर येथून हा मार्ग सुरू होईल; तो पेण तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील बलावली गावादरम्यान उभारला जाईल. या महामार्गासाठी सुमारे ६० हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यात भूसंपादनाच्या सुमारे २२ हजार कोटींच्या खर्चाचा समावेश आहे.

विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाच्या टप्पा एकच्या १२६ किमीच्या ११ बांधकाम कंत्राटांसाठी एमएसआरडीसीने जानेवारीमध्ये १८ कंपन्यांकडून ९०० दिवसांच्या बांधकाम मुदतीसह बोली आमंत्रित केल्या. एप्रिलमध्ये १४ कंपन्यांकडून ३३ निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी सात स्थापत्य अभियांत्रिकी कंपन्यांना सर्वात कमी बोलीदार म्हणून घोषित करण्यात आले. जूनमध्ये ही निविदाप्रक्रिया अंतिम होण्याची शक्यता आहे.

या कंपन्यांचा समावेश

विजेत्यांच्या यादीत लार्सन ॲण्ड टुब्रो, नवयुग अभियांत्रिकी कंपनी, ओरिएन्टल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स, इरकॉन इंटरनॅशनल, जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स, मेघा इंजिनिअरिंग ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्स आणि वेलस्पन एंटरप्रायझेस यांचा समावेश आहे. प्रत्येक पॅकेजच्या बांधकामासाठी सर्वात कमी बोली ही एमएसआरडीसीच्या अंदाजापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. त्यामुळे आर्थिक वाटाघाटी होण्यासाठी वेळ लागू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *