नवी मुंबई  : शहरांचे शिल्पकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिडको महामंडळात मंजूर पदांपेक्षा निम्म्याहून अधिक पदे रिक्त असल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. परिणामी सिडकोत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना काम पूर्ण होईपर्यंत वारंवार हेलपाटे मारावे लागतात. सध्या कार्यरत विविध संवर्गातील जवळपास सव्वाशे कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या अनेक महिन्यांपासून रखडल्याने त्‍यांच्यात निरुत्साह दिसून येत आहे.

१९७० मध्ये स्‍थापन झालेल्या सिडको महामंडळाचा कामाचा व्याप कालांतराने वाढत गेला. नवी मुंबई प्रकल्पाकरिता ९५ गावांतील प्रकल्पग्रस्तांची जमीन संपादित केल्यामुळे, भूमिहीन आणि बेरोजगार झालेल्या प्रकल्पग्रस्तांना अनेक आंदोलनानंतर सिडकोत नोकरी देण्यात आली. परंतु गत ४५ वर्षांत सिडकोतून निवृत्त होणाऱ्या प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढत गेल्याने प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांचा टक्का फार कमी राहिला आहे. शिवाय सरकारकडून नोकरभरती बंद राहिल्याने सिडकोतील रिक्त पदांची संख्याही वाढली आहे. सध्या सिडकोच्या मंजूर पदांपेक्षा निम्याहून अधिक पदे (जवळपास १६०० हून अधिक) रिक्त आहेत.

सिडकोतील मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध तयार करून व्यवस्थापनाच्या प्रस्तावाला १५ जून २०१६ मध्ये संचालक मंडळाने मंजुरी दिली होती. परंतु, आकृतीबंध मंजूर होऊन देखील त्याची अंमलबजावणी करण्याचे सौजन्य सिडको व्यवस्थापनाने दाखवले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध तयार करण्यासाठी नेमलेली समिती, घेतलेली मेहनत व केलेला खर्च अनाठायी झाल्याचा आरोप कर्मचारी वर्गाकडून होत आहे.

एक हजार ६१९ पदे रिक्‍त

नव्याने तयार केलेल्या आकृतीबंधानुसार, सिडकोत दोन हजार ७९७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सद्यःस्थितीत एक हजार १७८ अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. तर निम्म्याहून अधिक म्हणजेच तब्बल एक हजार ६१९ पदे रिक्त आहेत. याशिवाय मनुष्यबळ पुरवणाऱ्या खासगी एजन्सीमार्फत ३०० कर्मचारी सिडकोत कार्यरत आहेत.

पदोन्नत्या रखडल्याने कर्मचारी नाराज

सिडकोचा इंजिनिअरिंग विभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. या विभागात कार्यकारी अभियंत्याची १५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ८ पदे रिक्त आहेत. तर सहा कर्मचारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. सहायक कार्यकारी अभियंत्यांच्या एकूण ४२ पदांपैकी १६ पदे रिक्त असून १६ कार्यकारी अभियंता पदे पदोन्नतीने भरली जात नाहीत, तोपर्यंत सहायक कार्यकारी अभियंत्यांना पदोन्नतीच्या प्रतीक्षेतच राहावे लागणार आहे. अशीच परिस्थिती १६ सहायक अभियंत्यांच्या पदोन्नतीबाबत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *