लैलाच्या सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा

मुंबई : अभिनेत्री लैला खान हिच्यासह तिची आई आणि चार भावंडांच्या २०११ सालातील हत्याकांडाप्रकरणी लैलाचे सावत्र वडील परवेज ताक याला सत्र न्यायालयाने शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली. परवेज याला त्याच्यावरील आरोपांत दोषी ठरवल्यानंतर न्यायालयाने शिक्षेचा निर्णय शुक्रवारपर्यंत राखून ठेवला होता.

परवेज याला न्यायालयाने खुनाचा कट रचणे, खून करणे आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. याप्रकरणी अंतिम निर्णय देताना न्यायालयाने ताक याला फाशीची शिक्षा सुनावली.

परवेज हा लैलाच्या आईचा तिसरा पती होता. फेब्रुवारी २०११ मध्ये हे हत्याकांड उघडकीस आले होते. इगतपुरी येथील लैलाच्या बंगल्यावर लैला, तिची आई आणि तिच्या चार भावंडांची हत्या झाली होती. परवेज याने लैलाच्या आईच्या मालमत्तेवरून झालेल्या वादानंतर आधी तिची, नंतर लैला आणि तिच्या चार भावंडांची हत्या केली होती, असा पोलिसांचा आरोप आहे.

जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी परवेज याला अटक केल्यावर काही महिन्यांनंतर लैला आणि तिच्या कुटुंबीयांचे हत्याकांड उघडकीस आले होते. तसेच, त्यांचे कुजलेले मृतदेह बंगल्यातून बाहेर काढण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी परवेज याच्याविरूद्ध ४० साक्षीदार तपासले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *