रमेश औताडे
मुंबई : सव्वातीन लाख हेक्टर जलक्षेत्र असणारा कोकण ७२० किलोमिटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्याने समृध्द आहे. असे असताना जिथे पाणी नाही तिथे मत्स्य विद्यापीठ म्हणजे, आंधळ दळतंय अन् कुत्रं पीठ खातय असा प्रकार आहे. त्यामुळे सरकारने आता शाळा कॉलेज प्रवेश सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय नियोजन आयोगाने २०११ साली दिलेला ” जागतिक मत्स्य विद्यापीठ अहवाल” धूळ झटकून पाहावा व मत्स्य विद्यापीठाचे मुख्य केंद्र नागपूर न करता कोकण करून जागतिक पातळीवर कोकणचे नाव अजून मोठे करावे. अशी मागणी केंद्रीय नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली आहे.
केंद्रीय नियोजन आयोगाच्या माध्यमातून डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली कोकणात जागतिक कीर्तीचे मत्स्य विद्यापीठ होण्यासाठी एक अहवाल सन २०११ साली महाराष्ट्र सरकारला दिला गेला होता. या अहवालाकडे कोकणातील काय कोणत्याही लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही. त्यामुळे हा अहवाल धूळखात पडला आहे.
स्वर्ग असणाऱ्या कोकणात दाभोळचा एनरॉन , नानारची रिफायनरी, लोट्याची एम आय डी सी असे अनेक रासायनिक प्रकल्प कोकणात आणून कोकण केमिकल झोन करण्याचे व स्वर्गासारख्या कोकणाचा नरक करण्यासाठी सरकारचे शढयंत्र सुरू असून जिथे पाणी नाही तिथे मत्स्य विद्यापीठ असा अजब गजब कारभार सरकार का करत आहे ? असा सवाल डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केला. कोकण, मासे व निसर्ग हे समीकरण आहे. कोकणातील हापूस , मच्छी , लोणचे जगभर प्रसिद्ध आहे. जगाला कोकणाचे कौतुक आहे. मात्र सरकारला नाही. कोकणात मत्स्य विद्यापीठ करण्यासाठी एक हजार कोटी खर्च आहे. मात्र लाखो करोडो रुपये खर्च करून कोकणाचा विषारी केमिकल झोन करण्याचे षडयंत्र सुरू आहे. लोकप्रतिनिधी तर आरोप प्रत्यारोप व ईडी भीतीपोटी या पक्षातून त्या पक्षात पळत सुटले आहेत. विकास व धोरण या दोन्ही शब्दांचा त्यांना विसर पडला आहे.
कोकणातील समुद्रात फक्त मासे नाहीत. तर हजारो प्रकारची जैवविविधता आहे. परदेशात अशी जैवविविधता खूप कमी प्रमाणात आहे. जगभरात नसलेली जैवविविधता भारतात व कोकणात आहे. मात्र सरकारला त्याचे कौतुक नाही. विषारी केमिकल प्रकल्प आणून स्वर्ग असणारा कोकण नर्क तयार करण्याचे पाप सरकार करत आहे. आता शाळा कॉलेज प्रवेश सुरू झाले आहेत. त्यामुळे सरकारने २०११ चा अहवाल धूळ झटकून पाहावा व अहवालाप्रमाने रत्नागिरीत मत्स्य विद्यापीठाचे मुख्य केंद्र करावे. सव्वातीन लाख हेक्टर जलक्षेत्र असणारे कोकण जगभरातील जैवविविधतेचे प्रमुख केंद्र निर्माण करावे. अशी मागणी केंद्रीय नियोजन आयोगाचे मा.सदस्य व या अहवालाचे प्रमुख डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली आहे.