अर्ज भरण्याची ३१ मे अंतिम तारीख

ठाणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेच्या नव्या नियमावलीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. पुन्हा पूर्वीच्या नियमावली नुसार प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी १७ मे पासून अर्ज मागविण्यात येत आहेत. ठाणे जिल्ह्यातून आरटीई साठी ६४३ शाळा पात्र असून ११ हजार ३७७ जागांसाठी ही प्रक्रिया पार पडणार आहे. गेल्या आठवड्याभरात ११ हजार ४०४ बालकांचे अर्ज दाखल झाले आहेत. पालकांना ३१ मेपर्यंत आरटीईच्या संकेतस्थळावर आपल्या बालकाची नोंदणी करता येणार आहे, अशी माहितीठाणे जिल्हा शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

सन २०२४ – २५ या शैक्षणिक वर्षाकरिता राबविण्यात येणाऱ्या आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारने नवे बदल केले होते. या नव्या नियमावलीत विद्यार्थी राहत असलेल्या एक ते तीन किमी परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, जिल्हा प्रशासनाच्या किंवा अनुदानित शाळांमध्येच प्राधान्याने मुलांना प्रवेश घ्यावा लागणार होता. या बदलामुळे पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. कारण, या नव्या नियमावलीमुळे गरीब, वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना नामांकित खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळणे कठीण झाले होते. परंतू, अखेर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे पुन्हा पूर्वीच्या नियमावली नुसार प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून १७ मे पासून पालकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्या पालकांनी नव्या नियमावलीनुसार १७ एप्रिल ते १० मे पर्यंत अर्ज केले होते, ते अर्ज रद्द केले असून त्यापालकांना पुन्हा अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ठाणे जिल्ह्यात महापालिका तसेच पंचायत समिती क्षेत्रातील ६४३ शाळा आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठरल्या असून ११ हजार ३७७ जागांसाठी ही प्रक्रिया पार पडणार आहे. ठाणे जिल्ह्यातून आठवड्याभरात ११ हजार ४०४ अर्ज दाखल झाले आहेत. तरी, ज्या पालकांनी अद्याप अर्ज दाखल केलेले नाही त्यांनी ३१ मे पर्यंत आरटीईच्या संकेतस्थळावर अर्ज दाखल करावा, असे आवाहन जिल्हा प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.

यंदा अर्ज भरण्यास मुद्दत वाढ मिळणार नाही

या प्रवेश प्रक्रियेसाठी गठीत करण्यात आलेल्या पडताळणी समितीकडून प्रवेश पात्र असलेल्या बालकाचे प्रवेशाकरिता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाते. या समितीस पुरेसा वेळ देणे अवश्यक असून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम दिनांक ३१ मे आहे. कारण, या प्रवेश प्रक्रियेतून निवड झालेल्या मुलांचे जून मध्ये शाळा प्रवेशाची प्रक्रिया सुरु होते.त्यामुळे पालकांनी या मुदतीत अर्ज भरणे गरजेचे आहे. या प्रक्रियेस ३१ मे नंतर मुदतवाढ दिली जाणार नाही, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *