मुंबई : डोंबिवली आज केमिकल कंपनीत झालेल्या बॉयरलच्या स्फोटाने हादरली. या स्फोटात अमुदान केमिकल कंपनीतील आठ कामगार होरपळून ठार झालेत. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की तब्बल चार किलोमीटर पर्यंत कानटळ्या बसविणारा आवाज गेला. केमिकल कंपनीत आगीचे उंचच उंच लोळ आणि धुराचे लोट उसळल्याने मदतकार्यात् अग्नीशमन दलाला अडचणी आल्या परंतु तरीही त्यांनी प्रयत्नांची शर्थ करून अनेक कामगारांचे जीव वाचविले. संतापचा बाब म्हणजे स्फोट झालेल्या अमुदान केमिकल्स कंपनीत बॉयलररसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे अनाधिकृत बॉयलर बसवून निरअपराध कामगाराचे जीव घेणार्या मालक आणि अधिकारीवर्गावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संतप्त नागरीकांनी केली आहे.
गुरूवारी दुपारी डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत लागलेली ही आग इतकी मोठी होती की आजूबाजूच्या कंपन्यांमध्येही ही आग पसरली. या स्फोटामध्ये आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण यामध्ये जखमी झालेले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 ते 6 बंबांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तर, उद्योगमंत्री उदय सामंत हेही घटनास्थळी पोहोचले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेत तत्काळ प्रशासनाला नियंत्रण मिळवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
3 ते 4 किमीपर्यंत स्फोटाचा आवाज
स्फोटाची तीव्रता भीषण असल्याने डोंबिवलीतील रहिवाशी इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या, तर परिसरातील दुकानांच्या काचा फुटून रस्त्यावर पडल्याचं दिसून आलं. या बॉयलरच्या स्फोटाचा आवाज 3 ते चार किलोमीटरपर्यंत ऐकू आला आणि आजूबाजूच्या घरांच्या, हॉटेल्स आणि ऑफिसच्या काचा फुटल्याचे व्हिडिओ व फोटो सोशल मीडियातून समोर आले आहेत.
उपचाराचा खर्च सरकार करणार-सामंत
मंत्री उदय सामंत यांनी डोंबिवली एमआयडीसी येथील दुर्घटनास्थळी भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकारतर्फे करण्यात येणार आहे. या दुर्घटनेची संपूर्ण चौकशी केली जाईल, अशी माहितीही मंत्री सामंत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
९ वर्षांपूर्वीच्या स्फोटाची आठवण
२६ मे २०१६ रोजी एमआयडीसी फेज २ मधील प्रोबेस कंपनीत स्फोट झाला होता. या घटनेची तीव्रता अधिक असल्याने कंपनीत काम करणाऱ्या १२ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर, आजुबाजूच्या परिसरात राहणाऱ्या २१५ जणांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते. पंचनामे झालेल्या मालमत्तेचा आकडा साधारणपणे ७ कोटी ४३ लाख रुपयांपर्यंतचा होता.
स्फोटाची चौकशी करून दोषींवर कारवाई करू – मुख्यमंत्री
डोंबिवली स्फोटाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सध्या बचावकार्याला प्राथमिकता देण्यात आली असून त्यानंतर या दुर्घटनेला जे कुणी जबाबदार असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.