काहीतरी नवीन…
श्याम तारे
लग्न समारंभ, वाढदिवस किंवा इतर कोणताही कार्यक्रम असला तरी आणि आमंत्रण पत्रिकेत कृपया भेटी आणू नयेत अशी सूचना केली असली तरी आपल्याला भेटवस्तू न घेता जाणे योग्य वाटत नाही हा माणसाचा स्वभावधर्म आहे. माझा वाढदिवस आहे तर मला काहीतरी मिळणार आणि मिळायला हवे अशी प्रत्येकाची इच्छा असणे हे देखील स्वाभाविकच म्हणावे लागेल. कुणाला काही तरी देणे आणि कुणाकडून काहीतरी घेणे यात अधिक आणि दीर्घकाळ आनंद कुणाला होतो याचा आपण फारसा विचार करीत नसलो तरी विज्ञानाचे मात्र या विषयावर देखील संशोधन सुरु आहे.
विषय देण्यात आनंद असतो की घेण्यात असा आहे. अमेरिकेतील दोन महत्वाच्या विद्यापीठांनी या विषयावर अभ्यास केला आहे. आपण हे नेहमी बघतो की एखादे काम मग ते कितीही आनंदाचे असले तरी ते वारंवार करावे लागले तर आपला आनंद काहीसा कमी होत असतो. असा काही काळ गेल्यानंतर मात्र आपल्याला मन स्थिर झाल्यासारखे वाटते आणि मग आनंदाचा प्रश्न येत नाही. याला ‘स्थिर आनंद’ म्हणता येईल. आपल्या इच्छा पूर्ण होण्याचा आनंद मात्र क्षणभंगुर असतो हेही आपण अनुभवले असेल. परंतु आश्चर्याची बाब अशी की इतरांना काहीही देण्यामधून जो आनंद निर्माण होतो तो दीर्घकाळ टिकणारा असतो.
शिकागो विद्यापीठाचे प्राध्यापक एड ओ’ब्रायन यांनी मनोविज्ञान संघटनेच्या आपल्या लेखात म्हटले आहे की, “तुम्हाला आपला हा आनंद कायम ठेवायचा असेल तर आपण देण्याच्या अनुभवात काही बदल करू शकतो. जे आपण देतो ते घेणाराच्या अपेक्षेपेक्षा वेगळे असावे. प्रत्येक घेणाराची मानसिकता प्रत्येक वेळी वेगळी असेल आणि त्याच्या अपेक्षेपेक्षा आपण काही वेगळे देऊ शकलात तर प्रत्येक वेळी आपल्यासाठी नाविन्य कायम राहते आणि घेणाराचा आनंद आपल्याला स्वत:च्या आनंदात दिसू शकतो.”
या प्रयोगात ९६ कॉलेज विद्यार्थ्यांनी भाग घेतला. प्रत्येकाला सातत्याने पाच दिवस दररोज ५ डॉलर्स दिले गेले. त्यांना सूचना होती की रोज एकाच प्राकारे हे पैसे खर्च करायचे आहेत. काही निवडक विद्यार्थ्यांना सांगितले गेले होते की पैसे स्वत:वरच खर्च करायचे आणि इतर काही विद्यार्थ्यांना सांगितले गेले की त्यांनी पैसे इतरांवर खर्च करायचे आहेत. यात तुम्ही ‘टिप’ दिलेलीही चालेल आणि देणगी पात्रात पैसे टाकले तरीही चालतील.
रोज दिवस संपताना विद्यार्थ्यांनी आपण पैसे कसे खर्च केले त्याचा हिशेब द्यायचा होता आणि त्यासोबतच त्यांच्या एकूण आनंदाची टक्केवारी द्यायची होती. या आव्हानाचे जे निकाल मिळाले ते एक विशिष्ट आकृतीबंध दाखवीत होते. ज्यानी स्वत:वरच पैसे खर्च केले होते त्या विद्यार्थी मित्रांचा आनद कमी कमी होत गेला होता आणि ज्यांनी इतरांसाठी पैसे खर्च केले होते ते विद्यार्थी अगदी अखेरच्या पाचव्या दिवसापर्यंत सुरुवातीइतकेच आनंदी होते.
प्रश्न पैशाचा नसतो तर तो असतो आपला हात देण्यासाठी तयार आहे या समाधानाचा. रक्कम विचारात न घेता कोणत्याही प्रकारे काही देण्यात दीर्घकालीन आनंद आहे आणि हा आनंद घेण्यात नसतोच बहुधा….
प्रसन्न फीचर्स