नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीचे दोन टप्पे आता शिल्लक आहेत. प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. यातच नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवरील भुमिकेवरून काँग्रेसला लक्ष केले आहे. पाकिस्तानची भीती दाखविणारे मोदीच बिनबुलाये तेथे जातात असा आरोप विरोधकांनी केला होता. याचा समाचार घेताना मी तर पाकिस्तानची ताकद तपासण्यासाठी
लाहोरला गेलो होतो असा मार्मिक टोला मोदीं यांनी विरोधकांना लगावला.
“पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असल्याने आपण त्यांचा आदर केला पाहिजे, असं काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर म्हणाले होते. यावर बोलताना मोदी म्हणाले की, मी स्वतः लाहोरला जाऊन त्यांची ताकद तपासली आहे. तिथे एक रिपोर्टर, ‘हाय अल्ला तौबा, हाय अल्लाह तौबा’ असे बडबडत होता. मोदी व्हिसाशिवाय पाकिस्तानात कसे आले? असा प्रश्न त्याला पडला होता. मी म्हणतो पाकिस्तानला घाबरायचे कशाला? एके काळी हा आमचा भाग होता, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१५ साली अचानक लाहोरला गेले होते. अफगाणिस्तानहून परतताना पंतप्रधान नरेंद्र मोदी लाहोरला पोहोचले होते आणि त्यांनी तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतली होती. २५ डिसेंबर रोजी त्यांची भेट झाली, तेव्हा ते नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसाला गेल्याचे बोलले जात होते. पंतप्रधान मोदींनी नवाझ शरीफ यांच्या आईला भेटवस्तूही दिल्या. त्यांच्या या भेटीची जोरदार चर्चा झाली. पंतप्रधान मोदींच्या या अचानक भेटीकडे पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारण्याचा एक पुढाकार म्हणून पाहिले जात होते.
पठाणकोट, उरी आणि त्यानंतर पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्यांमुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंध पुन्हा एकदा बिघडले आहेत.