माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांच्या नेतृत्वात बविआ शिष्टमंडळाची सूचना

विरार : तोंडावर असलेला पावसाळा आणि लांबलेली नालेसफाई यामुळे वसई-विरार शहरवासीयांनी काळजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर वसई-विरार महापालिका माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांनी पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांची आज ( २४ मे) भेट घेऊन महापालिकेच्या नऊही प्रभागांतील पावसाळापूर्व नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी, अशी सूचना केली आहे. या वेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक महेश पाटील व माजी महिला व बालकल्याण सभापती माया चौधरी उपस्थित होत्या.

सध्या वसई-विरार महापालिकेकडून शहरातील नाल्यांची साफसफाई करण्यात येत आहे. त्यासाठी नऊ प्रभागांत नालेसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आजपर्यंत एकूण ६८% नालेसफाईचे काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे ३,४८,००,००० रुपये खर्च करून घेण्यात आलेल्या ड्रेन मास्टर या यंत्राची मदत या वर्षी नालेसफाईकरता घेण्यात आलेली आहे. नालेसफाई पूर्ण करण्याची निर्धारित ३१ मे ही तारीख जवळ आली आहे.  परंतु वसई-विरार शहरातील अंतर्गत छोटे-मोठे नाले सफाई अपूर्ण आहे. त्यामुळे या नाल्यांची सफाई निर्धारित वेळेआधी पूर्ण होणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रशांत राऊत यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळाने केली आहे.

मध्यंतरीच्या काळात विरार पूर्व भागातील रेल्वे कल्व्हर्ट क्रमांक : ८३ जवळ नवीन रेल्वे ट्रॅकचे काम हाती घेण्यात आलेले होते. या कामासाठी विरार पूर्वेकडून येणारा मुख्य नाला पाईप टाकून तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला होता. मात्र या ट्रॅकचे काम पावसाळ्यापूर्वी संपेल, अशी शक्यता दृष्टिपथात नसल्याने वसई-विरार महापालिकेने विरार शहर पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली होती. बंद केलेले नाले पावसाळ्यापूर्वी खुले करावेत, अशी मागणी वसई-विरार महापालिका प्रभाग समिती ‘ब`चे प्रभारी सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांनी पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अनुभाग अभियंत्याकडे पत्राद्वारे केली होती. विशेष म्हणजे माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांनी या संदर्भात वसई-विरार महापालिकेसोबत पत्रव्यवहार करून ही समस्या निदर्शनास आणून दिली होती. त्यांच्या पत्राची दखल घेऊन महापालिकेने रेल्वेला बंद केलेले नाले पावसाळ्यापूर्वी खुले करण्याची विनंती केली होती.

सदर रेल्वे ट्रॅकचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे; अन्यथा पाईप टाकून भराव केलेल्या मार्गाला पर्यायी व्यवस्था करण्यात यावी. तसेच या कामासाठी टाकलेल्या मातीच्या भरावामुळे व बांधकामाच्या पाइलिंगमुळे नाल्यात मोठ्या प्रमाणात माती जमा झालेली आहे. परिणामी नाल्यातील पाण्याचा प्रवाह संथगतीने वाहत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आलेले होते. त्यामुळे नाल्यातील माती बाहेर काढून नाल्याचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली होती.

या पत्राची दखल घेऊन पूर्वेकडील संतनगर, तारवाडी, जयश्री जगन्नाथ नगर, विवा जांगीड, मोहक सिटी परिसरात तसेच नालासोपारा स्थानक परिसर पाण्याखाली जाण्याची भीती लक्षात घेऊन रेल्वेद्वारे तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेल्या कल्व्हर्ट क्रमांक : ८३  जवळील नाल्यातील मातीभराव पावसाळ्यापूर्वी साफ करण्याच्या अनुषंगाने शुक्रवार, ३ मे रोजी महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका अधिकारी व रेल्वे अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीनंतर वसई-विरार शहरातील रेल्वेलाईनलगतचे बहुतांश कल्व्हर्ट सफाईचे काम पालिकेने केले आहे. त्यामुळे पाणी सुरळीत वाहून जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. परंतु शहरांतर्गत अनेक नाल्यांची सफाई अद्याप बाकी आहे. ही साफसफाई पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हावी; अन्यथा शहरवासीयांना पूरस्थितीला पुन्हा तोंड द्यावे लागेल. परिणाम आर्थिक व जीवित हानी संभवते. त्यामुळे ही कामे लवकरात लवकर करण्यात यावेत, अशी अपेक्षा माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान;  प्रभाग समिती ‘सी’मधील चंदनसार, फुलपाडा परिसरातील नाल्यांसह प्रभाग समिती ‘ब’मधील तारवाडी नाला, पाम मार्केट नाला, नाना-नानी पार्क नाला, पिंपळवाडी नाला, विवा जांगीड नाला, सह्यादी नगर नाला, कोकण नगर नाला, मनवेल पाडा नाला इत्यादी नाल्यांची पाहणी करून या नाल्यांतील गाळ व माती काढून त्यांची लवकरात लवकर सफाई करण्यात यावी. जेणेकरून पावसाळ्यात पुराच्या पाण्याचा निचरा होऊन परिसरातील रहिवाशांना दिलासा मिळू शकेल, अशी सूचना प्रशांत राऊत यांनी या पत्राद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *