१ जूनपासून कार्यान्वित होणार; २४ तास मिळणार सेवा

मुंबई ः पावसाळ्यात इमारत कोसळून किंवा दरड कोसळून इमारतीचे नुकसान होणे, दुर्घटना घडल्यास अपघातग्रस्तांना तत्काळ मदत करता यावी म्हणून वांद्रे पूर्व येथील एसआरए मुख्यालयालगत १ जूनपासून आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष सुरू करण्यात येणार आहे. त्याबाबतचे निर्देश एसआरए प्राधिकरणाने जारी केले आहेत.

गोरेगावच्या उन्नत नगर येथील जय भवानी या सात मजली इमारतीला मागील वर्षी लागलेल्या आगीत ९ जणांचा मृत्यू, तर ४० हून अधिक रहिवासी जखमी झाले होते. यानिमित्ताने एसआरए इमारतींची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे समोर आले होते. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्याबरोबरच अपघात घडल्यास तत्काळ मदत उपलब्ध करून देता यावी म्हणून एसआरए मुख्यालयात आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष सुरू करण्यात येणार आहे.

नियंत्रण अधिकारी २४ तास संपर्कात

अभियांत्रिकी विभागात कार्यरत असलेले सहाय्यक अभियंता व दुय्यम अभियंता यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. नियंत्रण अधिकारी २४ तास भ्रमणध्वनीद्वारे आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातील ऑपरेटरशी संपर्कात राहून काही अघटित घडल्यास संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधून त्याबाबतची माहिती देतील. त्यानंतर नियंत्रण कक्षाचा ताबा घेऊन त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री व संबंधितांशी संपर्क साधण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता यांच्यावर राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *