पनवेल ः पहिला पाऊस पडण्यापूर्वी ग्रामीणसह पनवेलच्या शहरी भागात वर्षभर हमखास टिकणारे कैरीचे लोणचे बनवण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे घरोघरी लोणचे बनवण्यासाठी लागणाऱ्या खाराचा घमघमाट सुटला असून अवकाळी पावसाच्या भीतीने आंबा बागायतदारांनी आंबे बाजारात आणल्याने सध्या बाजारात कैरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

मार्च, एप्रिल, मेच्या उन्हाळी हंगामातच पावसाळ्यापूर्वीच्या बेगमीला वेग येतो. काळे, लाल तिखट, नागली, उडीद, पापड, कुरडया, शेवया अशा वाळवणाचे पदार्थ बनवण्यासाठी गृहिणींची लगबग असते. कारण याच दिवसांत वर्षभर लागणारे विविध खाद्यपदार्थ बनवून ठेवले जातात. त्यानुसारच मेमध्ये पहिला पाऊस पडल्यावर वर्षभर टिकणारे कैरीचे लोणचे बनवले जाते. मराठमोळ्या जेवणाच्या ताटात आंबट-गोड-तिखट लोणचे असल्याशिवाय जेवणच पूर्ण होत नाही. त्यामुळे जेवणाची रंगत वाढवणारे लोणचे प्रत्येक घरातील अविभाज्य असा घटक बनला आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे घरोघरी लोणचे बनवण्याची तयारी सुरू झाली असून मागणीमुळे कैरीचे भावही शेकडा पाचशे ते सहाशे रुपये झाले आहेत.

मसाल्यांचे दर तेजीत

लोणच्यासाठी लागणारे शेंगदाणा तेल, गरम मसाले, मोहरी, हिंग, लवंग, हळद, बडीशेप, धने, दालचिनी, वेलची, मोहरी डाळीचे भाव कितीही वधारले तरी घरगुती लोणचे तयार केले जाते. त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागांत लोणच्यासाठी लागणारा मसाला घेण्यासाठी बाजारांत गर्दी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *