ठाणे : डोंबिवलीतील एमआयडीसीमधील अमुदान केमिकल कंपनीत झालेल्या अपघातस्थळाची राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील जखमी कामगारांचीही विचारपूस केली. तसेच स्फोटामुळे  बाधित झालेल्या कारखान्यांची माहिती घेतली.

डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील अमुदान केमिकल्स प्रा. लिमिटेड या रासायनिक कारखान्यामध्ये दि. 23 मे 2024 रोजी दुपारच्या सुमारास झालेल्या स्फोटाच्या घटनास्थळी कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी भेट देऊन यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता वेद सिंघल, कामगार आयुक्त  संजय देशमुख, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे संचालक देविदास गोरे, बाष्पके संचालनालयाचे धवल अन्तापूरकर यांच्यासह कामगार व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

स्फोट झालेल्या कारखान्यात ओर्गानिक्स पेरॉक्साईड या रसायनाचे उत्पादन केले जात होते. दि.२३ मे, २०२४ रोजी या कारखान्यात  रिअॅक्टर मध्ये स्फोट झाला होता. यामुळे आजूबाजूच्या इतर ३६ कारखान्यांचे नुकसान झाले. या घटनेमध्ये एकूण 12 मृत आणि 68 व्यक्ती जखमी झाले आहेत.

या स्फोटाच्या घटनेची औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालायाकडून चौकशी सुरु असून कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कारखान्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे श्री. खाडे यांनी सांगितले. स्फोटामध्ये जखमी झालेल्या कामगारांची एम्स हॉस्पिटल, डोंबिवली येथे जाऊन कामगार मंत्री श्री. खाडे यांनी विचारपूस केली. औषधोपचार घेत असलेल्या कामगारांचा खर्च शासनाकडून केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

या स्फोटामध्ये मृत झालेल्या कामगारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून रुपये 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याबाबतची माहिती कामगार मंत्री डॉ. खाडे यांनी दिली. याशिवाय मृत कामगारांच्या वारसदारास मिळणाऱ्या नुकसान भरपाई करीता कामगार न्यायालय आणि राज्य कामगार विमा विभागाकडे पाठपुरावा करण्याबाबत संबंधिताना निर्देश दिले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या भेटीदरम्यान स्फोट झालेल्या कारखाना मालकाविरुद्ध सुरक्षेमध्ये हलगर्जी केल्यामुळे कारवाई सुरु करण्यात आली असून पोलिसांकडून कारखान्याचे संचालक मलय मेहता यांना अटक करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *