अनिल ठाणेकर

ठाणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, ‘एससीईआरटी’ने  राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड हे या मुद्द्यावरुन कमालीचे आक्रमक झाले आहेत. शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा समावेश करण्याच्या हालचालींना जितेंद्र आव्हाड यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यासाठी जितेंद्र आव्हाड बुधवारी महाड येथे जाऊन मनुस्मृतीची होळी करणार आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथेच मनुस्मृतीची होळी केली होती. ही बाब लक्षात घेत सरकारचा निषेध करण्यासाठी जितेंद्र आव्हाड देखील महाड येथेच मनुस्मृतीची होळी करणार आहेत.

मनुस्मृतीमधील तीन श्लोकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यासंदर्भातल्या सरकारच्या निर्णयाविरोधात डॉ. जितेंद्र  आव्हाड यांनी सर्वांना एकत्र येण्याचं आव्हान केले आहे. ज्या मनुस्मृतीने स्त्रियांचे अधिकार नाकारले, ज्या मनुस्मृतीमुळे आपले पूर्वज ५००० वर्ष त्रासात जगले, तीच मनुस्मृती पुन्हा एकदा हे सरकार आणत आहे, याचा तीव्र विरोध व्हायला हवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी या मनुस्मृतीचे दहन केले, त्याच ठिकाणी पुन्हा एकदा आपण जाऊन याचं दहन करणार आहोत आणि सरकारचा निषेध करणार आहोत त्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा, असे आवाहन डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. सत्ताधारी मागच्या दाराने त्यांच्या मनातील गोष्ट पूर्ण करु पाहत आहेत. आमच संविधान म्हणजेच मनुस्मृती, असं म्हणणारे जेव्हा सत्तेत येतात तेव्हा काय घडतं, त्याचं उदाहरण म्हणजे पाठ्यपुस्तकांचा यादीत पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश होत आहे. ज्या मनुस्मृतीने भारताच्या वाटोळं केलं, समाजात दुही माजवली आहे, समाजामध्ये चातुवर्ण्याचा समावेश केला, जातीभेद निर्माण केला, स्त्रियांना तर सर्वात घाणेरडी वागणूक घेण्याची पद्धती या मनुस्मृतीने जन्मला घातली, ती मनुस्मृती परत आणली जात आहे. जे लोक १९५० साली म्हणाले की, आम्हाला तुमचं संविधान मान्य नाही, आमचं संविधान म्हणजे मनुस्मृती. तेच लोक आता मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करत आहेत.  तुम्हाला आणि आम्हाला संविधान वाचवायचे आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२७ मध्ये मनुस्मृती दहन केलं आणि १९५० मध्ये संविधान जन्माला घातलं त्यासाठी आपण महाडला जात आहोत. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करून आपण मनुस्मृतीच दहन करतोय, संविधानासाठी दो बलिदान, असे डॉ.  जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

सुरबानानांचे नातू करणार मनुस्मृतीचे दहन

२५ डिसेंबर १९२७ रोजी मंचावर सहस्रबुद्धे, चित्रे, चिटणीस आदी उपस्थित होते. त्यांच्या समोर डॉ.  बाबासाहेब आंबेडकर हे मनुस्मृतीमधील प्रत्येक अध्याय वाचून दाखवत होते. मनुस्मृतीमधील हे अध्याय मंजूर आहेत का, असेही विचारत होते. त्यावेळेस लोकांकडून उत्स्फूर्तपणे नाही असेच उत्तर येत होते. त्यानंतर त्यांनी मनुस्मृती जाळण्याचा निर्णय जाहीर केला अन् मनुस्मृती जाळत असताना त्यांनी सहस्रबुद्धेंना विचारले, तुम्हाला मनुस्मृती जाळणे मान्य आहे का? त्यावर सहस्रबुद्धे म्हणाले, ब्राह्मण म्हणून नाहीच; पण, माणूस म्हणून तर नाहीच नाही! या सर्वांच्या मागे जी शक्ती उभी होती ती म्हणजे तत्कालीन नगराध्यक्ष सुरबानाना उपाख्य  चिटनीस  यांचे नातू मिलींद चिटणीस यांच्या हस्ते एक ऐतिहासिक संदर्भ म्हणून बुधवारी मनुस्मृती जाळण्यात येणार आहे, असेही डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *