राज्यात निकालांत मुलींनी बाजी मारली
१८ विषयांचा १०० टक्के निकाल
१८७ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण
निकालात मुंबई तिसऱ्या क्रमांकावर
मुंबई : बारावीपाठोपाठ दहावीतही यंदा ‘कोकण पॅटर्न’ नंबर एक ठरला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. राज्यात दहावीचा यंदाचा एकूण निकाल ९५.८१ टक्के इतका लागला आहे. यंदाही निकालामध्ये कोकण विभागानं बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९९.०१ टक्के लागला आहे. तर नागपूर विभागात सर्वात कमी म्हणजे ९४.७३ टक्के इतका निकाल लागला आहे. विशेष म्हणजे यंदाही निकालांमध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९७.२१ टक्के तर मुलांचा निकाल ९४.५६ टक्के लागला आहे. आकडेवारीनुसार, सर्वच विभागांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे.
एकूण ७२ विषयांपैकी १८ विषयांचा १०० टक्के निकाल लागला आहे. १५ लाख ४९ हजार ३२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी १४ लाख ८४ हजार ४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षी पेक्षा १.९८ टक्के निकाल जास्त लागला आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. यावेळी सचिव अनुराधा ओक उपस्थित होत्या.
कोकणपाठोपाठ दुसरा क्रमांक कोल्हापूर ९७.४५, पुणे ९६.४४ टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई- ९५.८३, अमरावती- ९५.५८, नाशिक ९५.२८, लातूर ९५.२७, छत्रपती संभाजीनगर ९५.१९ या मंडळाचा क्रमांक लागतो.
राज्यातील ९ हजार ३८२ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तर १८७ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. त्यापैकी लातूर मंडळातील १२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९७.२१ टक्के तर मुले ९४.५६ टक्के एवढे आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण २.६५ टक्के जास्त आहे.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दि.१ ते २६ मार्च या कालावधीत ५ हजार ८६ केंद्रांवर परीक्षेचे आयोजन केले होते. राज्यातील २३ हजार २७२ माध्यमिक शाळांमधील १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यामध्ये ८ लाख ५९ हजार ४७८ विद्यार्थ्यांसह ७ लाख ४९ हजार ९११ विद्यार्थिनी आणि ५६ तृतीयपंथीय विद्यार्थ्यांचा समावेश होता.
ठाण्यातील दहावीच्या निकालात यंदा १.९३ टक्क्यांनी वाढ
ठाणे : बहुप्रतिक्षित असलेला दहावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा या निकालात १.९३ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे निकालावरुन स्पष्ट होत आहे. गेल्यावर्षी हा निकाल घसरला होता. यंदा निकालात पुन्हा वाढ झाली आहे. २०२३ रोजी दहावीचा निकाल ९३.६३ टक्के होता. यंदा या निकालात १.९३ टक्क्यांनी वाढ होत ९५.५६ टक्के लागला असल्याचे दिसून येत आहे.
गेल्यावर्षी मुलांचा निकाल ९१.९८ टक्के लागला होता तो वाढून यंदा तो ९४.३९ टक्क्यांवर पोहोचला. या निकालात २.४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे गतवर्षी मुलींचा निकाल ९५.३८ टक्के लागला होता. यंदा १.४१ टक्क्यांनी निकाल वाढून तो ९६.७९ टक्के इतका लागला आहे.
