मुख्यमंत्र्यांना भेटणार-ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ
ठाणे: पुण्याच्या संभाजी उद्यानात राम गणेश गडकरी यांचा पुतळा पुन्हा उभारायला लाज वाटते का ? असा सवाल प्रख्यात नाटककार, दिग्दर्शक अशोक समेळ यांनी केला आहे. गडकरी पुतळ्याबाबत आपण त्वरीत मुख्यमंत्र्यांची भेट घेवून पुतळा उभारणीबाबत विनंती करणार आहोत असेही अशोक समेळ यांनी सांगितले.
कल्याणच्या भाषाप्रभू राम गणेश गडकरी कट्ट्यातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर व भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांच्या जयंतीनिमित्त शनिवार व रविवारी व्याख्यानाचे आयोजन केले होते. रविवारी नाटककार अशोक समेळ यांनी गडकरी यांच्या नाटकातील सौदर्यस्थळे या विषयावर सुमारे सव्वा तास अभिनयासह विवेचन केले. गडकरी यांच्या नाटकातील `स्वगत’ त्यांनी साभिनय सादर केले. नाटकात स्वगत हा प्रकार आता संपला आहे असे सांगतांना गडकरी यांचे नाटके कशी अजरामर आहेत याबाबत त्यांनी विविध दाखले देत प्रतिपादन केले.
`भावबंधन’ पासून ते `राजसंन्यास’पर्यंत त्यांची नाटके आणि त्यांचे महत्व विशद केले. त्यांच्या नाटकातून नायिका ज्या घराघरात पोहचल्या त्या मालती, सिंधू, सुशिला, वसुंधरा इत्यांदी नायीकांची सोशिकवृत्ती ते कुलवधू मधील बंडखोर लतिकाचे वर्णन केले. शारदा या नाटकाने राम गणेश गडकरी यांना सर्वोच्च पातळीवर नेऊन ठेवले. पैसे असलेल्या म्हातार्यांशी लहान मुलींचे लग्न लावून देण्याची त्या काळी प्रथा होती. त्यावर केलेल्या विडंबनाला तोड नाही असे सांगतांनाच त्या नाटकातील अनेक गाणी रसिक गुणगुणत असत. `म्हातारा तितुका’ हे सर्वांत लोकप्रिय गाणे होते. त्या काळातील पौराहित्य संस्कारावर आधारलेले `प्रेमसंन्यास’ आणि `दारुची संगत माणसाला संपवते त्यावरील `एकच प्याला’ नाटकाचे त्यांनी रसभरीत वर्णन केले
राम गणेश गडकरी एकदा सहजच बालगंधर्वाना म्हणाले `तुला एक दिवस फाटक्या वस्त्रात आणून उभा करीन हे त्यांनी `एकच प्याला’मध्ये शब्दश: करुन दाखविले. ब्रिटीशांच्या राजवटीत `राकट देशा कणखर देशा, माझा महाराष्ट्र देशा’ हे त्यांचे स्फूर्ती गीत अवघ्या महाराष्ट्रातील घराघरात पोहचले. आयुष्यभर खस्ता खाणारा हा माणूस शारीरिक व्याधींशी लढत होता. परंतु सारखे लिहित होते. त्यांना माहिती होते माझे आयुष्य एवढेच आहे. जेवढे देता येईल तेवढे मी समाजाचे देणे लागतो. या पध्दतीने त्यांनी लिखाण केले. २२ जानेवारी १९१८ रोजी रात्री झोपतांना आपल्या सेवकाला राजसंन्यासचे कागद काढून ठेव मला उद्या नाटक पूर्ण करायचे आहे. असे सांगून झोपी गेलेले राम गणेश गडकरी उठलेच नाही. त्यांचा झोपतच २३ जानेवारी १९१८ रोजी मृत्यू झाला. गडकरी यांना त्यांचा नाटकाचा आनंद कधीच घेता आला नाही.
गडकरी जयंती निमित्ताने कल्याणच्या गडकरी कट्ट्यावर त्यांच्यासाठी एवढी माणसे जमतात हे ते स्वर्गातून पाहत असतील. खरं तर गडकरी कट्टा ही संकल्पनाच वेगळी आहे आणि ती राबविली गेली पाहिजे. मराठी भाषेला खर्या अर्थाने वैभव प्राप्त करुन देण्याचे काम राम गणेश गडकरी यांनी केले. त्याला साज बालगंधर्व, कुसुमाग्रज, कानिटकर यांनी नंतर चढविला असे सांगून पुन्हा एकदा गडकरी यांच्या पुतळ्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
प्रारंभी गडकरी कट्ट्यांचे तुषार राजे यांनी प्रास्ताविक केले. २ जानेवारी २०१७ रोजी गडकरी यांच्या पुतळ्याची विटंबना झाली आणि २०१८ साली त्यांच्या शताब्दी महोत्सवाप्रसंगी कल्याणमध्ये राम गणेश गडकरी कट्ट्याची स्थापना करण्यात आली. गडकरी कट्ट्याने राबविलेल्या विविध उपक्रमाची माहिती देण्यात आली. गडकरी कट्ट्याचे मेघन गुप्ते यांच्या हस्ते अशोक समेळ यांचा सत्कार करण्यात आला.
सैनिकी शिक्षण आवश्यक
शनिवारी सावरकर जयंती निमित्त `सैन्यांपुढील आव्हाने व `सैन्यातील संधी’ या विषयावर वीरमाता अनुराधा गोरे यांनी आपले विचार प्रगट केले. केवळ बंदूक चालविणाराच सैन्यात काम करु शकतो असे नव्हे तर सर्व कौशल्य असणारे डॉक्टर, इंजिनिअर, विविध विषयातील तज्ञांना सैन्यात काम करता येते. सैनिकाला व त्यांच्या कुटुंबाला शासन कधीच वार्यावर सोडत नाही. त्यामुळे आपला पहिला अग्रव्रâम हा सैन्य असायला हवा असे आवाहन केले.
शनिवार दि. २५ व रविवार दि. २६ मे रोजी झालेल्या दोन दिवसाच्या जयंती महोत्सवात कल्याणकर रसिकांनी मोठी गर्दी केली होती. सूत्रसंचालन रत्ना हिले व योगेश बुडुक यांनी केले. कार्यव्रâमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री तुषार राजे, पुरुषोत्तम फडणीस, प्रविण देशमुख, मेघन गुप्ते, प्रा. मुकुंद बापट, दिपक देशपांडे, प्रसन्न कापसे, दिपक अग्रवाल, नविन राजे, अनुश्री फडणीस इत्यांदींनी मेहनत घेतली.
