अशोक गायकवाड

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात नैसर्गिक नालेसफाई अंतिम टप्प्यात असून आज महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी नवी मुंबईच्या उत्तरेकडून दिघा, ऐरोली विभागापासून नालेसफाई कामांच्या प्रत्यक्ष पाहणीला सुरूवात करीत अधिक सखोल नालेसफाई करण्याचे निर्देश दिले.

यावर्षी कुठेही पाणी साचून राहणार नाही असा दिलासा नागरिकांना देताना आयुक्तांनी ७७ मोठ्या नैसर्गिक नाल्यांची १०० टक्के सफाई पूर्ण झाली असून उर्वरित १९ मोठ्या नाल्यांची साधारणत: ३० टक्के राहिलेली सफाई येत्या ५ दिवसात पूर्ण होईल असे सांगितले. ही नालेसफाई जलद गतीने करताना योग्य रितीने व संपूर्ण स्वच्छता होईल याकडे बारकाईने लक्ष देऊन करावी अशा सक्त सूचना आयुक्तांनी दिल्या. यामध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असे स्पष्ट निर्देश देतानाच आयुक्तांनी नालेसफाई करणारे कामगार हे गमबूट, हँडग्लोव्हज् अशी सुरक्षा साधने वापरूनच काम करीत असल्याची खात्री करून घ्यावी असेही निर्देशित केले. नाल्यांची सफाई होत असताना त्यातून काढला जाणारा गाळ लगेच उचलण्यात यावा तसेच काही नाल्यांचे डिसेल्टिंग करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आले असून तेही काम लगेचच पूर्ण करून घेण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. तत्पूर्वी आयुक्तांनी दिघा विभागाच्या पावसाळापूर्व पाहणीमध्ये दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने कामे झाली आहेत काय याची पुनर्पाहणी केली. दिघा भाग काहीसा सखल आहे. तसेच इलठणपाडा येथील धरणाचा विसर्ग पश्चिमेकडील खाडीकडे वहात येताना मध्ये झोपडपट्टी, एमआयडीसी भागातील नाले काहीसे अरूंद असल्याने त्यांची सखोल सफाई होणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन नाल्यांतून खाडीत वाहून जाणारे पाणी विनाअडथळा वाहून जाण्याच्या दृष्टीने नालेसफाईची पाहणी केली व अधिक सखोल नालेसफाईचे निर्देश दिले. यावेळी काही ठिकाणी नाल्यांमधून जाणा-या केबल्समुळे प्रवाहात कचरा अडून राहू शकतो हे लक्षात घेत त्याठिकाणी चॅनल टाकावेत व केबल त्यावर बांधून पाण्याच्या प्रवाहाला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना आयुक्तांमार्फत देण्यात आल्या. त्याचप्रमाणे नाल्यांच्या काठांच्या भिंतीवर उगवलेली रोपटीही काढून टाकावीत असे त्यांनी सूचित केले. नालेसफाई प्रमाणेच परिसर स्वच्छतेकडेही काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश देताना आयुक्तांनी स्वच्छता ही आपल्या शहराची ओळख असल्याने स्वच्छतेबाबत कुठलाही हलगर्जीपणा चालणार नाही असे स्पष्ट संकेत दिले. रस्त्यांच्या शेजारील हरितपट्टे तसेच सुशोभित जागा यांची नियमित निगा राखण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी तसेच पदपथ नागरिकांना चालण्यासाठी विनाअडथळा खुले राहतील तसेच त्यावरील झाकणे तुटली असतील तर ती तातडीने बदलून घ्यावेत असेही आयुक्तांनी निर्देशित केले. नवी मुंबई शहरातील पावसाळापूर्व कामांची सद्यस्थिती आयुक्तांनी काल २७ मे रोजी विशेष आढावा बैठक घेत संबंधित अधिकारी यांचेकडून जाणून घेतली आणि आज दिघा, ऐरोली विभागापासून प्रत्यक्ष पाहणीला सुरूवात केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *