मुंबई : 5 वर्षे कितीही काही काम केले, तरी फार लक्षात ठेवलं जातं असं नाही. भारतासारखी अल्प स्मरणशक्ती जगात कुठेही पाहायला मिळत नाही.. हे सत्य आहे. निवडणुकीच्या तीन ते चार महिन्यातील घडामोडींव निवडणुकीचा निकाल अवलंबून असतो. आणि म्हणूनच साक्षात ब्रम्हदेवालाही यंदाच्या निवडणूकीचा निकाल सांगता येणार नाही असे हताश उद्गार अजित पवार यांनी काढलेत.
संघटना म्हणून आम्ही आमच्या स्तरावर काळजी घेणार आहोत. याबद्दल कोणीही तीळमात्र शंका बाळगू नका, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिले. मुंबई येथे आयोजित पक्ष कार्यकारिणी बैठकीत अजित पवार बोलत होते.
शिवसेनेला ठोकल्यानंतर अल्पसंख्यांकांना समाधान मिळते
अजित पवार म्हणाले, मला आठवतंय जेव्हा आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे काम करायचो. त्यावेळी आम्हाला कधीकधी सांगितले जायचे की, शिवसेनेवर टोकाची भूमिका घ्या. शिवसेनेला ठोका. महाविकास आघाडीत असताना असा विचार असायचा. मी त्यांना विचारायचो का? ते म्हणायचे शिवसेनेला ठोकल्यानंतर अल्पसंख्यांकांना समाधान मिळते. त्यांना आनंद वाटतो. पण यावेळेस तर अल्पसंख्याक समाज शिवसेनेबरोबर जायला निघाला होता. त्यामुळे काय, कुठे, कसे गणित बदलते पाहा. यावेळेस ब्रम्हदेव जरी आला तरी सांगू शकणार नाही.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, बीड, जालना आणि परभणी जिल्ह्यात जातीवादावर निवडणूक झाली. मराठा-मराठेत्तर असं काही गावांमध्ये सुरु झालं. अरे देश कुठे चाललाय? जग कुठे चाललय? आणि आपण जाती-पातीमध्ये अडकून बसलोय. आपण शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचाराबाबत बोलतो. मी भुजबळ साहेबांना सांगितलंय, आम्ही सरकारमध्ये आहोत, तोपर्यंत मनुस्मृतीचा निर्णय होऊ देणार नाहीत. मी दीपकला (मंत्री दीपक केसरकर) सुद्धा या संदर्भात सांगितलं आहे. दीपक पूर्वीचा राष्ट्रवादीचाच आहे. आपणच त्याला आमदार केला. कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल पण आपल्या विचारधारेला ठेस पोहोचेल असा निर्णय होऊ द्यायचा नाही, अंसही अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.
