अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानपरिषेदसाठी मुंबै बँकेच्या नलावडेंना उमेदवारी

स्वाती घोसाळकर

मुंबई : अवघ्या देशासहीत महाराष्ट्रही येत्या चार जूनच्या लोकसभा निकालाकडे डोळे लावून बसला आहे. या निकालानंतर राज्यातही त्याचे पडसाद उमटणार आहेत. त्यादृष्टीने भाकिते वर्तवली जात आहेत. पण हा निकाललागण्याआधीच भाजपाप्रणित महायुतीतील धुसफूस उघड झाली आहे. काल राज ठाकरेंच्या मनसेने कोकण पदवीधर मतदार संघातून अभिजित पानसेंची उमेदवारी घोषित केली तर आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मुंबई शिक्षक मतदार संघातून शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. कोकण मतदार संघात सध्या भाजपाचे निरंजन डावखरे विद्यामान आमदार आहेत. तर मुंबईच्या शिक्षक मतदार संघातून शिक्षक भारतीचे कपिल पाटील निवडून आले होते.

शिवाजी नलावडे हे राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक व जिल्हाध्यक्ष राहिलेले असून, महाराष्ट्र राज्यातील सहकार चळवळीमध्ये त्यांचे योगदान राहिलेले आहे. गेले ३० मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. मुंबई शहरात 2 शाळा उभारण्यात त्यांचा सहभाग आहे.

राज्यातील विधानपरिषदेच्या 4 मतदारसंघांसाठी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली आहे. त्यानुसार, मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ तर नाशिक आणि मुंबईत शिक्षक मतदार संघात ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकांसाठी 26 जून रोजी मतदान होणार असून 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

मुंबई पदवीधर मतदार संघातून विलास पोतनीस तर कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे तसेच, मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदार संघातून किशोर दराडे यांची मुदत 7 जुलै रोजी संपत आहे.  संपत आहे.

महायुतीच्या बैठकीशिवाय मनसे आणि राष्ट्रवादीने ही उमेदवारी जाहीर केल्याने वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. हे कमी की काय म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही विधानपरिषदेच्या चारही जागा लढवण्याचे जाहिर केले आहे. शिंदे सेनेचे माजी आमदार डॉ. दिपक सावंत आणि सचिव मोरे यांनी अनुक्रमे मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघावर आपल्या नावाची घोषणाही परस्पर करून टाकली आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणूकीत महायुतीत सध्यातरी एकला चलो रे चा नारा बुलंद झाला आहे. या उलट भाजपाकडून याबाबत सावध भुमिका घेतली जात आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल असे सुत्रांकडून समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *