अशोक गायकवाड

नवी मुंबई : माझी वसुंधरा अभियानामध्ये पर्यावरण संवर्धन माहितीपूर्ण कार्यशाळा आयोजित करून पथनाट्यांतुन जनजागृतीवर भर दिला जात असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त (२) शिरिष आरदवाड यांनी दिली आहे.

शहरातील पर्यावरण सुधारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविले जात असून नवी मुंबई महानगरपालिकेने अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवत नेहमीच चांगली कामगिरी केलेली आहे. यावर्षीही ‘माझी वसुंधरा अभियान’ ४.० अंतर्गत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये लोकसहभागावर विशेष भर देण्यात येत असून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. पर्यावरण विषयक जनजागृती करताना पथनाट्यासारख्या लोकांना चटकन् भावणा-या माध्यमाचा प्रभावी उपयोग करण्यात येत असून २१ मेपासून नमुंमपा क्षेत्रातील आठही विभागांमध्ये वर्दळीच्या ठिकाणी पथनाट्यांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये भूमी, वायू, जल, अग्नी व आकाश या निसर्गाच्या पंचतत्वांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी दैनंदिन जीवनात प्रत्येक माणसाने करावयाच्या छोट्या छोट्या बाबींची माहिती पथनाट्यांच्या माध्यमातून त्यावर हसत खेळत भाष्य करीत सादर करण्यात आली असून या माध्यमातून जनजागृतीवर भर देण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या आठही विभागांत गर्दी असते अशा मुख्य २२ ठिकाणी सादर झालेल्या माझी वसुंधरा अभियानविषयक पथनाट्यांना उपस्थितांचा चांगला प्रतिसाद लाभला असून पथनाट्य सादरीकरण करणा-या कलावंत समुहाचे उपस्थिांकडून कौतुक झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *