भाईंदर : मिरा-भाईंदर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरण आणि एमआयडीसी या दोन्हीकडून पावसाळ्यातील देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी बुधवारी (ता. २९) ते शुक्रवार (ता. ३१) असे पाठोपाठ शटडाऊन घेण्यात येणार आहेत. परिणामी शहरात चार ते पाच दिवस तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे. एकीकडे उन्हाळ्यामुळे आधीच पाण्याची मागणी वाढत असताना होत असलेल्या शटडाऊनमुळे शहरात पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
मिरा-भाईंदर शहराला स्टेम प्राधिकरणाकडून ८६ दशलक्ष लिटर, तर एमआयडीसीकडून ११५ दशलक्ष लिटर पाणी दिले जाते. या दोन्ही स्रोतांकडून सुमारे दोनशे लिटर पाणी मिळत असले तरी शहराची दैनंदिन पाण्याची गरज २२५ ते २३० दशलक्ष लिटर आहे. त्यामुळे नागरिकांना आधीच ३० ते ३५ तासांनी पाणी मिळते. यात एकाही स्रोताकडून पाणीपुरवठा खंडित झाला, तरी शहरात पाणीटंचाई निर्माण होते. आता तर स्टेम, एमआयडीसी या दोघांकडून पावसाळ्यापूर्वीच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी पाठोपाठ शटडाऊन घेण्यात येणार आहेत. स्टेमकडून होणारा पाणीपुरवठा बुधवारी (ता. २९) सकाळी ९ ते गुरुवारी (ता. ३०) सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे, तर एमआयडीसीचा पाणीपुरवठा काही तासांच्या अंतराने म्हणजेच गुरुवारी (ता. ३०) रात्री १२ ते शुक्रवारी (ता. ३१) रात्री बारा वाजेपर्यंत २४ तासांसाठी बंद असणार आहे. यामुळे शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण होणार आहे.
स्टेम प्राधिकरणाचा पाण्याचा उद्भव शहाड, टेमघर येथे आहे, तर एमआयडीसीचा पाण्याचा उद्भव बारवी धरण आहे. या दोन्ही स्रोतांपासून मिरा-भाईंदर शहर हे सुमारे ८० किमी लांब असून पाणीपुरवठ्यासाठी तेवढ्या लांबीची जलवाहिनी अंथरण्यात आली आहे. त्यामुळे दोघांपैकी एकाचा पाणीपुरवठा खंडित झाला, तरी जलवाहिनी पाण्याने पूर्ण भरून पाण्याचा दाब पूर्ववत होण्यासाठी दोन दिवस लागतात. त्यामुळे दोन ते तीन दिवस नागरिकांना पाणी कमी दाबाने व उशिराने तर मिळतेच; शिवाय पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडून ३० ते ३५ तासांवरचा पाणीपुरवठा ६० ते ७० तासांवर जातो. आता दोघेही लागोपाठ शटडाऊन घेणार आहेत. त्यामुळे नागरिकांना चार ते पाच दिवस तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भीती आहे.
खासगी टँकरचे उखळ पांढरे
तीव्र पाणीटंचाईचा खासगी टँकरमालकांना मात्र चांगलाच लाभ होणार आहे. शहरात पाचशे ते सातशे लिटर पाणी देणारे छोटे, तसेच दहा हजार लिटर पाणी देणारे टँकर कार्यरत आहेत. शिवाय या पाण्याची गुणवत्ता काय असते, याबाबतही शंका व्यक्त होत असते; मात्र शहरातील पाणीटंचाईदरम्यान हेच पाणी घेण्यावाचून नागरिकांपुढे दुसरा पर्याय नसणार आहे.
विविध कारणाने शटडाऊन रखडले
वास्तविक एमआयडीसीकडून घेण्यात येणारा शटडाऊन गेल्या आठवड्यात शुक्रवारी घेण्यात येणार होता; मात्र आयत्या वेळेस तो रद्द करण्यात येऊन या आठवड्यात घेण्यात येणार आहे. एमआयडीसीचा शटडाऊन गेल्या आठवड्यात झाला असता, तर नागरिकांचा त्रास काही प्रमाणात कमी झाला असता. दुसरीकडे स्टेम प्राधिकरणाचा गेल्या दोन महिन्यांपासूनचा शटडाऊन घेण्याचा प्रस्ताव होता. मात्र काही ना काही कारणांमुळे तो पुढे ढकलण्यात आला. आता हे दोन्ही शटडाऊन एकाच आठवड्यात काही तासांच्या अंतराने एका पाठोपाठ घेण्यात येत आहेत.
