ठाणे : ठाणे उत्पादन शुल्क विभागाने नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या हाॅटेल, बार-रेस्टाॅरंटवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली. ठाणे जिल्ह्यातील ११ हाॅटेल आणि बारचे परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने निलंबित केले आहेत. अल्पवयीन मुलांना मद्य देणे, रात्री उशीरापर्यंत बार सुरू असणे अशा विविध कारणांमुळे हे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
हे परवाने पुढील आदेश होई पर्यंत निलंबित असणार आहे. असे असले तरी ही कारवाई तुटपुंजी असल्याचा दावा नागरिक करत आहे. भिवंडी, ठाणे शहरात ठिकठिकाणी बेकायदा ढाबे, हाॅटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीने मद्य विक्री होत असल्याचा आरोप ठाणेकर करत आहेत.
पुण्यातील कल्याणीनगरमध्ये बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत केलेल्या कार अपघातात दोन जणांना प्राण गमवावा लागला होता.त्यानंतर राज्यभरात अशा कारवाईला वेग आला आहे. आयुक्तालय क्षेत्रात रात्री १.३० आणि ग्रामीण क्षेत्रात रात्री १२ वाजेपर्यंत बार, हाॅटेल सुरू ठेवण्यास परवानगी आहे. असे असतानाही या वेळेहून अधिक काळ बार सुरू होते, विना वाहतुक पासचा मद्यसाठा आढळून आला. तसेच मद्य सेवनाचा परवाना नसतानाही मद्य पुरविले जात असल्याचे दिसून आल्याने ही कारवाई करण्यात आले आहे.
या हाॅटेलवर कारवाई
१) मे. यल्लो बनाना फुड कंपनी ( चितळसर मानपाडा, घोडबंदर, ठाणे )
२) मे. क्रेझी बार (नेरूळ, नवी मुंबई)
३) मे. हाॅटेल साईराज (भिवंडी, रांजनोली)
४) मे. गणेशकृपा रेस्टाॅरंट (मानपाडा, डोंबिवली)
५) मे. हाॅटेल गिरीश (एमआयडीसी, डोंबिवली)
६) मे. हाॅटेल सरगम (नारपोली, भिवंडी)
७) मे. हाॅटेल इंडिगो स्पाईस इंकयार्ड (जीएनपी गॅलेरिया, डोंबिवली)
८) मे. डासिंग बाॅटल ( सेक्शन १७, उल्हासनगर)
९) मे. पारो रेस्टाॅरंट अँड बार (रांजनोली, भिवंडी)
१०) हाॅटेल साई सिद्धी (शिळफाटा, डोंबिवली)
११) हाॅटेल गोपाळाश्रम (वागळे इस्टेट, ठाणे)
