राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष, राज्याचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गाजलेले कृषीमंत्री शरदराव पवार यांच्या उत्तुंग प्रतिमेचे तुकडे पाडण्याचे काम त्यांच्याच एके काळच्या चेले-चपाट्यांनी जोरात सुरु केले असून महाराष्ट्र त्याकडे अचंब्याने पाहतो आहे. शरद पवार बोलतात एक आणि करतात दुसरेच किंवा ते जे बोलतात तसे ते वागत नाहीत. राजकारणात त्यांचा शब्द हा प्रमाण मानून उपयोगी नसते असे त्यांच्या बरोबरीचे अनेक राजकीय नेते हे गेली चाळीस एक वर्षे सांगत आले आहेत. पण राज्यातील आणि देशातील सर्वसामान्य जनतेच्या मनात त्यांच्या विषयी एक ममत्व होते, एक सद्भावही होता. शरद पवारांकडे देशाच्या आणि राज्याचे विकासाचे एक व्हीजन आहे हे पत्रकारांनाही दिसत होते आणि राजकीय डावपेच आणि शिवाजीराजांची कात्रजची ऱणनीती वापरणारे आधुनिक जाणते राजे, अशी त्यांची एक प्रतिमा महाराष्ट्रातील जुन्या पिढीतील पत्रकारांनाही जोपासली होती. शरद पवार हे राज्याच्या काँग्रेसच्या राजकारणातली एक चमकता सितारा बनले ते युवा चळवळीपासून. यशवंतराव चव्हाणांनी त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवल्याने त्यांचे नेतृत्व मुळात रुजले. ते बारामती या आपल्या खेडेगावातून थेट राज्यस्तरावर आले तेंव्हा त्यांच्याकडे मुंबईत राहायला घर नव्हते. ते पक्षाचे राज्यस्तरावरील चिटणीस बनले आणि टिळक भवन या पक्षकार्यालयातच राहायला लागले, ही गोष्ट साठच्या दशकाच्या सुरुवातीची. त्यांच्या नेतृत्वाचा विकास त्या काळात वेगाने झाला. मुंबई व राज्य काँग्रेस मधील अनेक नेते त्यांच्याकडे भविष्यातील राज्याची आशा या नजरेतून पाहात होते. शरद पवारांनी त्या आशा पल्लवीत ठेवण्याची कामगिरी त्या सुरवातीच्या दशकभरात नक्कीच पार पाडली. ते आधी गृह राज्यमंत्री होते. नंतर कृषीमंत्री म्हणून कार्यरत होते. वसंतराव नाईकांच्या काळात ते मंत्री मंडळात आले होते आणि वसंतदादा पाटील जेंव्हा आणीबाणीनंतर मुख्यमंत्री झाले तेंव्हा शरदरावांच्या नेतृत्वाला पंख लाभले. दादांचे सरकार ऐतिहासिक कारणांनी जेंव्हा कोसळले तेंव्हा त्या बंडाचे नेतृत्व शरद पवारंकडे आले होते. खरेतर कोल्हापूरचे आबासाहेब कुलकर्णीं, मराठवाड्यातील सुंदरारव सोळंखे असे अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेते त्या बंडाचे सूत्रधार होते. इंदिरा काँग्रेसच्या नासिकराव तिरपुडेंना धडा शिकवण्यासाठी काँग्रेस एस आणि काँग्रेस आयचे ते आघाडी सरकार पाडावेच लागेल यावर ही मंडळी ठाम होती. शरदरावांकडे गोविंदराव दिक, दत्ता मेघे, सुशीलकुमार शिंदे असे अनेक तरूण आमदार होतेच. त्या बंडाचे नेतृत्व जरी पवारांकडे आले तरी ते खरे सूत्रधार नव्हते. पण शरदने माझ्या पाठीत खंजीर खुपसला असे जे उद्गार नंतर दादांनी काढले ते आजवर शरद पवारंना सतावत आहेत. त्या ऐतिहासिक बंडा नंतर केवळ चाळीशीतील शरद पवार हे राज्याच्या राजकारणात एकदम मोठे नेते बनले. तर्कतीर्थ लक्षमणराव जोशी, गोविंद तळवलकरां सारख्या विद्वान लेखक पत्रकारांनी त्या बंडामागची तात्विक भूमिका सावरून धरली होती. पवारांकडे प्रशासकीय कौशल्य तर होतेच, पण कृषी क्षेत्राचा विकास कऱण्यासाठी फळबागांची योजना, पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शेत तळी व लहान धरणांच्या योजना, औद्योगीकरणाला गती देण्यासाठी अधिक एमआयडीसी काढणे, रस्त्यांना चालना देणे, पायभूत विकासासाठी विविध सरकारी संस्थांना बळ देणे हे सारे त्यांनी त्या अल्प काळातही करून दाखवले होते. त्यामुळे त्यांची प्रतिमा उत्तुंग बनली. गेली चाळीस वर्षे त्यांची धुरंधर राजकारणी ही प्रतिमा त्यामुळे चांगलीच वाढलेली होती. 2014 पासून त्या प्रतिमेचे एकेक पापुद्रे सोडवण्याचे, त्यांच्या विश्वासाऱ्हतेवर प्रश्नचिन्ह उभे करण्याचे काम भाजपाचे नेते विविध स्तरावंर करत राहिले आहेत. त्तपूर्वी शरद पवरांच्या जनमानसातील स्थानाला पहिला धक्का कोणी दिला असेल तर ते शिवसेनेचे विधानसभेतील एकमेव आमदार राहिलेले छगन भुजबळ यांनी. 1986 ला जेंव्हा शरदराव हे राज्याचे मुख्यमंत्री बनले तेंव्हा मुंबई शहरातील अनेक भूखंडावरील मनपाची आरक्षणे काढून तिथे खाजगी व्यक्ती, बिल्डरांना व्यापरी बांधकामे कऱण्याची परवानगी शरद पवारांच्या नेतृत्वातील नगरविकास विभागाने दिली. अशा 86 भूखंडांची यादी भुजबळांनी विधानसभेत फडकावली आणि हातवारे करीत भूखंडाचे श्रीखंड पवारांनी ओरपले असे आरोप केले. त्या कार्यकाळात मुंबईतील बंद कापड गिरण्याच्या जमिनींवरील मॉल, हॉटेल आदि बांधकामाचे महाद्वार खुले करणारे मिल धोरणही शरदरावंनी आणले. त्या विरोधात भुजबळांसह भाजपा नेतेही बोलत होतेच. पुढे पवारांच्या विरोधात आणखी जोरदार तोफा डागल्या त्या गोपिनाथ राव मुंडेंनी. मुंडे विरोधी पक्ष नेता म्हणून काम करू लागेल कारण भुजबळ हे शिवसेना सोडून पवारांच्या नेतृत्वात सुधाकररावांच्या मंत्रीमंडळात मंत्री बनले होते. पवार तेंव्हा दिल्लीत संरक्षण मंत्री होते. त्या वेळी मुंबईत झालेल्या भीषण बाँब्सफोट मालिके नंतर मुंडेंच्या आरोपांचे सत्र सुरु झाले. शर्मा नावाच्या दोघा भावांनी लखनौ ते मुंबई असा प्रवास पवारांच्या विमानतून केला होता व ते बाँबस्फोटातील आरोपी होते. त्या आरोपांनी राजकारणाचे गुन्हेगारीकऱण हा विषय गाजू लागला. एन्रॉन प्रकल्प हा खरेतर शरदरावंनी स्वतः आणला नव्हता. नरसिंहरावांच्या पंतप्रधानपदाच्या काळात बड्या खाजगी कंपन्यांना देशातील वीजक्षेत्र खुल करण्याचे धोरण भारत सरकारने घेतले. तेंव्हा अमेरिकन कंपनीचा मोठा वीज निर्मिती प्रकल्प महाराष्ट्रात आला पहिजे या भावनेने पवारांनी त्या प्रकल्पाला राज्य सरकारची मदत देऊ केली. त्या वीज खरेदी करारा वरून भाजपाने रान पेटवले आणि मोठ्या भ्रष्टाचाराचे आरोप पवारांवर झाले. तेही पवारांचे प्रतिमा हनन होते खरे. पण तरीही विरोधी पक्षाने केलेले आरोप म्हणून जनता त्याकडे पाहात होती. पण गेल्या दहा वर्षात क्रमशः पवारांची जुनी प्रतिमा हळुहळु कमी तेजस्वी होत गेली आहे. कारण राजकारणात ते खोटं बोलत आहेत अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. गेल्या दोन तीन महिन्यात तर पवारांच्या दीर्घकालीन सहकाऱ्यांनीच त्यांच्या विरोधात जी विधाने केली त्यातून हे काम अधिक वेगाने होताना दिसते आहे. भाजपा सोबत पवार जाणार, ते काँग्रेसची साथ सोडणार या चर्चा गेली दहा वर्षे रंगतच होत्या. कारण 2014 चे निकाल जाहीर होण्याच्या आधीच राज्यात भाजपाचे सरकार स्थापन कऱण्यासाठी पवारांनी न मागताच एकतर्फी पाठिंबा जाहीर करून टाकला होता. त्या नंतर पुढच्या पाच वर्षात किमान दोन वेळा त्यांनी भाजपाचे शीर्षस्थ नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या बरोबर महाराष्ट्रात एकत्र सरकार करण्याच्यादृष्टीने वाटाघाटी केल्या. सत्ता वाटपाच्या सर्व गोष्टी ठरवून घेतल्यानंतर ऐनवेळी पवार माघारी फिरले. 2016 -17 मधील त्या चर्चांचे घोडे शिवसेनेला सत्ते पासून दूर करण्याच्या मुद्दयावर अडल्याचे सांगितले गेले. नंतर 2019 चा ऐतिहासिक निकाल लागला. एकत्र विधानसभा लढल्या नंतरही भाजपाच्या 105 आमदरां समवेत सरकार करण्यासाठी 56 आमदारांच्या ठाकरेंनी नकार दिला. का ? तर त्यांना स्वतःलाच मुख्यमंत्री पद हवे होते. ते जमले नाही म्हटल्यावर पडद्यामागे पुन्हा शरद पवार, मोदी शहांच्या बैठका बोलणी, सुरु झाली आणि तिकडे ठाकरेंनी शरद पवारांकडे आघाडीचे प्रस्तावही सादर केले. या दोन्ही चर्चा टोकाला पोचत असतानाच अचानक एके दिनी पहाटे शरद पवारांचे पुतणे अजितदादा पवारांनी देवेन्द्र फडणवीसांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन टाकली. फडणवीसांच्या दुसऱ्या सरकारची स्थापना झाली. ते साडे तीन दिवसांचे सरकार ही प्रचंड धक्कादायक घटना होती. पाठोपाठ आठच दिवसात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसह काँग्रेसचे आमदार सत्तेत असे सरकार स्थापन झाले आणि त्यात पुन्हा आठ दिवसातच अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री बनले. या सर्व कालावधीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्या नंतर अजित दादा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ हे सारे पवारांवर शाब्दिक घाव घालत आहेत. शरद पवारांनी 1978, 1986 आणि 1999 मध्ये तीन वेळा ज्या राजकीय कोलांट उड्या मारत दोन वळा काँग्रेस पक्ष सोडला आणि एकदा पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेशही घेतला, त्या साऱ्या घटनाक्रमाला एक निराळे वळण आता दादा देत आहेत. हे प्रतिमा हनन राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी ओळखीचे असले तरी सर्व सामान्य जनतेसाठी धक्कादायकच छरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *