अशोक गायकवाड
अलिबाग : जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्याने रोहा तालुक्यातील ताम्हाणशेत आदिवासीवाडी पाणीदार झाली आहे. दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात या आदिवासी वाडीवरील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता, सद्यस्थितीत पाणी टंचाई मधून नागरिकांची सुटका झाली असून, वाडीवरील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा सुरू आहे, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ भरत बास्टेवाड यांनी दिली.*
जनतेला स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे. तसेच गावातील महिलांचा त्रास कमी व्हावा, यासाठी केंद्र सरकारमार्फत जलजीवन मिशन ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने चांगलीच कंबर कसली आहे. या योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमाणसी किमान ५५ लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे. जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे गुणवत्ता पूर्वक पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून नियमित योजनानिहाय कामांची माहिती घेण्यात येत आहे. अधिकारी कामांना भेटी देऊन कामाची पाहणी करीत आहेत.रोहा तालुक्यातील तांबडी ग्रामपंचायत हद्दीत जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर योजना कार्यान्वित झाल्याने ताम्हाणशेत आदिवासी वाडी पाणीदार झाली आहे. या आदिवासी वडिवरील ३०४ कुटुंबांना घरोघरी नळ कनेक्शन देवून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. सदर वाडीला पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी साठवण विहीर बांधण्यात आली असून, सदर विहिरीत पुरेसा पाणी पुरवठा शिल्लक आहे. ताम्हाणशेत आदिवासी वाडी आदिवासी वाडीला दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. वाडीवर पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतर येथील नागरिकांना परिसरात असणाऱ्या एका खासगी फॉर्म हाऊस वरून पाणी आणावे लागत होते. आश्वासक पाणी स्त्रोत नसल्याने ही परिस्थिती निर्माण होत होती. मात्र जल.जीवन मिशन अंतर्गत वाडीला पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी साठवन विहीर बांधून पाणी स्त्रोत निर्माण करण्यात जिल्हा परिषद प्रशासन यशस्वी झाले आहे.
