अशोक गायकवाड

रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची मतमोजणी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय १४ टेबलवरती फेरीनिहाय होणार आहे. रत्नागिरी, राजापूर मतदार संघाच्या प्रत्येकी २५ फेऱ्या, चिपळूण, कणकवली प्रत्येकी २४ फेऱ्या, सावंतवाडी २२ फेऱ्या तर, कुडाळ मतदार संघात २० फेऱ्या होणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.

मिरजोळे एमआयडीसीतील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात ही मतमोजणी सकाळी ८ वा. सुरु होणार आहे. टपाली मतदान मतमोजणीसह प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय एकाच वेळी मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. २६५ चिपळूण विधानसभा मतदार संघात ३३६ मतदान केंद्र असल्याने १४ टेबलवर २४ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. ३६६ रत्नागिरी विधानसभा मतदार संघात ३४५ मतदान केंद्र असल्याने १४ टेबलवर २५ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. २६७ राजापूरमध्ये ३४१ मतदान केंद्र असल्याने १४ टेबलवर २५ फेऱ्यांमध्ये मजमोजणी होणार आहे. २६८ कणकवली विधानसभा मतदार संघात ३३२ मतदान केंद्र असल्याने २४ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. ३६९ कुडाळ विधानसभा मतदार संघात ३७८ मतदान केंद्र असल्याने २० फेऱ्यांमध्ये तर, २७० सावंतवाडी विधानसभा मतदार संघात ३०८ मतदान केंद्र असल्याने २२ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. मतमोजणी प्रतिनिधींना मोबाईल वापरण्यास निर्बध असून मतमोजणीसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या प्रतिनिधींना प्रत्यक्ष मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल आणता येणार नाही. याठिकाणी मोबाईल वापरावर भारत निवडणूक आयोगाने संपूर्णपणे निर्बंध घातला आहे. याची नोंद घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *