गेली ५० वर्षांहून अधिक काळ अखंड भजनसेवा
पनवेल : गेली ५० वर्षांहून अधिक काळ भजन सेवेची परंपरा अखंडपणे जपणारे आणि आपल्या शिकवणीतून हजारो शिष्य घडविणारे खारघर मधील रांजणपाडा गावातील रायगड भूषण भजन पंडित ह.भ. प.निवृतीबुवा चौधरी यांनी सादर केलेल्या भजन व अभंगांमुळे पुणे जिल्ह्यातील पिंपळे सौदागर येथील साईबाबा मंदिर उत्सव सोहळ्यात श्रोते मंत्रमुग्ध झाले.
‘श्री तारा माँ मिशन’च्या दहाव्या वर्धापनदिन निमित्त पिंपले सौदागर येथील साईबाबा मंदिरात भजन, कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंडित निवृतीबुवा चौधरी यांनी ‘अबीर गुलाल उधळीत रंग’, ‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल’, ‘जोहार मायबाप’, ‘विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी’,’ हरे कृष्णा हरे’ आदी निवडक भजने, अभंग सादर करुन श्रोत्यांचे मन जिंकले. निवृत्तीबुवा चौधरी यांनी नेहमीच भजन आणि त्या अनुषंगाने सांस्कृतिक परंपरा टिकविण्याचे काम केले आहे. आपल्या वयाची ७५ वर्ष पूर्ण होऊनही ते कधीही या क्षेत्रात थकलेले नाहीत. स्वतःला झोकून देत हरिनामाची ते सेवा करत असतात, त्यामुळे या उत्सवात त्यांच्या गायनाने चैतन्य निर्माण झाले होते.
