बेकायदा पब, हुक्का पार्लर, डान्स बारवर कारवाईसाठी स्वतंत्र कक्ष

ठाणे : पुणे येथील पोर्श अपघाताप्रकरणानंतर जाग आलेल्या ठाणे उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात बेकायदा सुरू असलेल्या ११ हॉटेल आणि बारचे परवाने निलंबित केले असतानाच, त्यापाठोपाठ आता ठाणे पोलिसांनी बेकायदा पब, हुक्का पार्लर आणि डान्स बारवर कारवाईसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. तसेच अशा अवैध व्यवसायांना आश्रय देणाऱ्या स्थानिक पोलिसांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिला आहे.

ठाण्यातील बेकायदा हाॅटेल, पब, हुक्का पार्लर आणि डान्स बारवर कारवाई व्हावी अशी मागणी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी यापुर्वीच ठाणे पोलिसांकडे केली होती. परंतु त्यावर अपेक्षित कारवाई होत नसल्याबद्दल केळकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. पुणे येथील पोर्श अपघाताप्रकरणानंतर ठाण्यातील बेकायदा हाॅटेल, पब, हुक्का पार्लर आणि डान्स बारचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार केळकर यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन अशा व्यवसायांवर ठोस कारवाई करण्याची मागणी केली.

गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून ठाण्यातील तरुण पिढ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या बेकायदेशीर डान्स बार, पब आणि हुक्का पार्लर या अवैध व्यवसायांविरुद्ध महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करीत असून यासंदर्भात लोक चळवळही सुरू केली. यावर अधिवेशनातही आवाज उठवला. यानंतर ठाण्यातील या अवैध व्यवसायांवर कारवाई झाली. पण, त्यांनतर पुन्हा हे व्यवसाय सुरू होत असल्याची बाब आमदार केळकर यांनी आयुक्त डुंबरे यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच या अशा व्यवसायांवर ठोस कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

अवैध व्यवसायांवर नियमित आणि ठोस कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला असल्याची माहिती आयुक्त डुंबरे यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर अशा अवैध व्यवसायांना त्या-त्या विभागातील स्थानिक पोलीस ठाणे जबाबदार राहणार असल्याचे सांगून त्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त डुंबरे यांनी यावेळी दिल्याचे केळकर यांनी सांगितले. या संदर्भात ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

ठाण्यातील तरुण पिढी उद्ध्वस्त होऊ नये यासाठी या अवैध व्यवसायांविरुद्ध लोकचळवळ सुरू केली आहे. त्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. मागील काळात काही पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत गांभीर्याने काम केले, परंतु काही ठिकाणी दुर्लक्ष झाले. त्यामुळे यावर ठोस कारवाई करण्यासाठी पोलिस आयुक्तांना भेटून अनेक मागण्या केल्या. त्या मान्य करून त्याची अंमलबजावणी तातडीने करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

संजय केळकर (आमदार, ठाणे शहर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *