मुंबई: मायानगरी मुंबईलाहादरवून सोडणऱ्या  मुंबईतील गोल्डन क्राऊन हॉटेलचे मालक  जया शेट्टी यांच्या खूनप्रकरणी अंडरवर्ल्डमधील कुख्यात गुंड छोटा राजन याला मुबंईतील विशेष सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे.शुक्रवारी दिनांक 31 मे रोजी त्याच्या शिक्षेबाबतचा निर्णय घेतला जाईल.विशेष न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) छोटा राजनला दोषी ठरवले.
 छोटा राजन टोळीने जया शेट्टी यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती. शेट्टी यांना खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर छोटा राजन टोळीतील सदस्यांनी जुलै २००१ मध्ये जया शेट्टी यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.
छोटा राजन टोळीला खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर या टोळीने जया शेट्टी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी शेट्टी यांना सुरक्षा प्रदान केली. मात्र काही महिन्यांनी ही सुरक्षा हटवण्यात आली. सुरक्षा हटवल्यानंतर दोन महिन्यांनी राजन टोळीने शेट्टी यांच्यावर हल्ला केला. यात जया शेट्टी यांचा मृत्यू जागीच झाला.
छोटा राजन सध्या तुरुंगात असून त्याच्या इतर गुन्ह्यांप्रकरणी शिक्षा भोगतोय. २०१५ मध्ये त्याला इंडोनेशियातील बाली या शहरातून अटक करून भारतात आणण्यात आलं होतं. सध्या तो दिल्लीतल्या तिहारच्या तुरुंग क्रमांक २ मध्ये शिक्षा भोगतोय. या तुरुंगाला मोठी सुरक्षा व्यवस्था असते. अनेक मोठ्या आणि धोकादायक कैद्यांना या तुरुंगात ठेवलं जातं. राजन याचं खरं नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे असू असून तो सध्या ६४ वर्षांचा आहे.
राजन हा पूर्वी कुख्यात माफिया आणि मुंबई अंडरवर्ल्डमधील गुंड दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी होता. मात्र १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर दोघांमध्ये बिनसलं आणि राजनने स्वतःची वेगळी टोळी बनवली. या दोन टोळ्यांमध्ये अनेक वर्षे संघर्ष झालेला मुंबईकरांनी पाहिला आहे. १९९० आणि २००० च्या दशकात मुंबईत टोळीयुद्ध भडकलं होतं. या काळात राजन टोळी आणि दाऊद टोळीत अनेकदा मुंबईच्या रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये संघर्ष झाला. या टोळीयुद्धा अनेक गुंड मारले गेले तर अनेकांचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. एन्काऊंटरच्या भीतीने दाऊद, राजनसह अनेक कुख्यात गुंड मुंबईसह भारत सोडून पळू गेले होते. २०१५ मध्ये पोलिसांनी राजनला इंडोनेशियन पोलिसांच्या मदतीने अटक केली आणि भारतात आणलं. मात्र, दाऊद अजूनही फरार आहे. भारताची गुप्तचर यंत्रणा आणि पोलीस अजूनही दाऊदचा शोध घेत आहेत. मात्र दाऊद त्यांच्या हाती लागलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *