ठाणे -ठाण्यात चार महिन्यांत हिट अॅण्ड रनने तब्बल ३६ बळी घेतल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. तर या अपघातात १०६ जण कायमचे जायबंदी झाले आहेत. तसेच या घटनेमुळे येऊर, घोडबंदर भागातील नशेबाज आणि तळीरामांचे अड्डे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
पुण्यातील कल्याणीनगर येथे पोर्शे कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या हायप्रोफाईल प्रकरणामुळे ‘हिट अॅण्ड रन’चा गंभीर मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातदेखील ‘रॅश ड्रायव्हिंग, हिट अँड रन’ यांसारखे प्रकार चार महिन्यांत घडल्याचे समोर आले आहे.
तसेच पब, हुक्का पार्लरच्या संस्कृतीत नवीन पिढी करिअरचा ध्यास घेण्याऐवजी मौज, मज्जा, मस्तीमध्ये हरवत चालल्याचे भयानक वास्तव यानिमित्ताने पाहायला मिळत आहे.
यासंदर्भात भाजप आमदार संजय केळकर यांनी अनेकदा आवाज उठवला. विधानसभेत प्रश्नदेखील मांडले. दोन वर्षे हुक्का पार्लर, पबमुक्त ठाणे ही मोहीमसुद्धा राबवली; मात्र राजकीय आशीर्वाद आणि पोलिसांचेच पब आणि हुक्का पार्लरचालकांशी लागेबंदे असल्याने मोहीम १०० टक्के पूर्ण होऊ शकत नाही, असा आरोप आता होऊ लागला आहे.
कारवाईची भीतीच नाही
थर्टी फर्स्ट, गटारी, दिवाळी असो वा अन्य दिवशीही वाहतूक विभागामार्फत नाकाबंदी करत ड्रंक अॅण्ड ड्राईव्हला चाप लावण्याचा प्रयत्न केला जातो; पण चिरीमिरी द्यायची आणि पुढे जायचे, असा समज झाल्याने ही कारवाई कुणी गंभीरपणे घेत नसल्याचेही दिसते. जानेवारी २०२४ पासून वाहतूक पोलिसांच्या कारवाईकडे नजर टाकली असता तरुणाई मस्तीत धुंद असल्याचे दिसते.
