इको फ्रेन्डली लाईफच्या माध्यमातून समृद्ध भारत निर्माण करण्याचा प्रत्यक्ष कृती कार्यक्रम
ठाणे : दिवसेंदिवस वातावरणातील तापमान अधिकाधिक तीव्र होताना आपणास जाणवत आहे. दिवसागणिक वाढत चाललेली उष्णता अशीच वाढत राहिली तर पुढच्या काही वर्षातच भारतातील जीवसृष्टी नष्ट होण्यास वेळ लागणार नाही. जर येणाऱया काळात मनुष्यनिर्मित आपत्तीमुळे आरोग्यपुर्ण जीवनच जगता येणार नसेल तर अशा भौतिक सुख निर्मितीचा उपयोग काय ? यावर उपाय शोधून त्याची अंमलबजावणी करणे काळाची गरज आहे, ती ओळखून संपूर्ण भारतभर 700 कोटी फळझाडे लावून फळझाडांनी बहरलेला समृद्ध भारत निर्माण करण्याचा संकल्प इको फ्रेन्डली लाईफ या पर्यावरणवादी संघटनेच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. याची सुरुवात ५ जुन रोजी पर्यावरण दिनापासून करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व सरकारी प्रशासकीय आस्थापनांचा सहभाग मिळावा यासाठी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी यांची भेट घेण्यात आली. त्यांच्याबरोबर याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेचे सर्वेसर्वा पर्यावरण तज्ञ अशोक एन.जे. यांच्यासोबत सिद्धांत चासकर, कुणाल बागुल, सागर झेंडे, किशोर बनकर, राहूल गायकवाड आदी उपस्थित होते.
ठाणे जिल्ह्यामधील शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी, जव्हार, वाडा, मोखाडा, इत्यादी तालुक्यातील फळझाडांच्या लागवडीवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. संस्थेच्या ७०० कोटी फळझाडांनी बहरलेला समृद्ध भारत निर्माण करण्याच्या संकल्पनेला कुलकर्णी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच या उपक्रमाकरिता सामाजिक वनिकरण विभागाकडून काही प्रमाणात फळझाडे उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासन दिले. तसेच आता वेळ खूप कमी आहे. पुढील वर्षीय योग्य नियोजन करून या उपक्रमाकरिता अधिक फळझाडे तयार करण्यास संबंधितांना सांगता येईल त्यामुळे फळझाडांच्या रोपाची उपलब्धता अधिक होऊ शकेल. असे कुलकर्णी म्हणाले.
ठाणे जिल्हा वनरक्षक विभागाचे संतोष रास्ते यांनी देखील या उपक्रमाला रोपे देण्याची तयारी दर्शवली. तसेच भविष्यात मोठ मोठ्या कंपन्यांचा सीएसआर फन्ड या उपक्रमाकरिता कसा मिळेल याकरिता प्रयत्न करण्याबाबत मार्गदर्शन केले. ग्रामिण भागात होणारी प्रचंड वृक्षतोड थांबवण्यासाठी ग्रामिण भागातील संपूर्ण गाव कंपन्यांनी दत्तक घेऊन त्यांचा सीएसआर फंन्ड त्या गावातील शेतकऱ्यांसाठी इन्सेन्टीव्ह म्हणून दिल्यास ही वृक्षतोड पुर्णपणे थांबू शकते, असा आशावाद रास्ते यांनी व्यक्त केला. तसेच राज्यशासनाच्या पातळीवर या प्रकारचा जीआर काढून प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्यासाठी पब्लिक प्रा.पार्टनरशीप म्हणजेच पर्यावरणावर काम करणाऱ्या संस्था व पर्यावरण विभाग यावर देखरेख ठेवून लाखोंच्या संख्येने होणारी वृक्षतोड निश्चित थांबू शकेल, याबाबत सविस्तर चर्चा करताना ते पुढे म्हणाले, वनखात्यातील वर्कस पडीत जागा ह्या पुर्ण वृक्षलागवडीखाली आणता येतील त्यासाठी सामाजिक संस्था व वनखाते महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये नियमानुसार एग्रीमेन्ट करून मोठ्या प्रमाणात फळझाडांची लागवड करून जोपासता येईल. म्हणजेच प्रा.पब्लिक प्रार्टनरशीपमधून हे यशस्वी करता येईल. तसेच ८०० कि.मी.च्या संमृद्धी महामार्गावर दोन्ही बाजूंनी योग्य नियोजन करून फळझाडांची लागवड केल्यास संपूर्ण रस्ता सावलीमध्ये राहील. तापमान कमी होईल व फळझाडांचाही लाभ घेता येईल. पब्लिक प्रा.पार्टनरशीपमधून हे सहज करता येऊ शकते. या संदर्भात सरकारकडे कृती योजना सादर करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले,
संपूर्ण भारतभर 700 कोटी फळझाडे लावून फळझाडांनी बहरलेला समृद्ध भारत निर्माण करण्याचा प्रत्यक्ष कृती कार्यक्रम 5 जून 2024 पासून अर्थात जागतिक पर्यावरण दिनापासून सुरु करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील म्हसा या ठिकाणी धडक कृती कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमात आपण सहभागी होण्यासाठीचे निवेदन आणि इको फ्रेन्डली लाईफच्या माध्यमातून आखण्यात आलेल्या कार्यक्रमाची रुपरेषा असलेली माहिती पुस्तिका संस्थेचे प्रमुख पर्यावरण तज्ञ अशोक एन.जे. यांनी मान्यवरांना दिली.