ठाणे : सरकारी कार्यालयात फाईल्स, लेटर पॅड सारख्या स्टेशनरी साठी मोठा खर्च असला, तरी ठाणे मनोरुग्णालयात स्टेशनरी खर्चात बचत करण्यासाठी मनोरुग्णांचा हातभार लागतो आहे. मनोरुग्णांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध थेराप्युटिक ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून उपचार दिले जात आहेत. बुध्दीला चालना देताना व्यवसाय उपचाराचा उपयोग केला असून, मनोरुग्णांना स्टेशनरी तयार करण्याचे धडे दिल्यामुळे आता रुग्णालयासाठी लागणाऱ्या फाईल्स, डिस्चार्ज कार्ड व खावटी खर्च कार्ड सारख्या गोष्टी रुग्णालय कामकाजासाठी उपयोगी पडत आहेत.
ठाणे मनोरुग्णालयाचे नाव काढले की पटकन तेथील वातावरण डोळ्यासमोर येतं… मेंदूचा ताबा सुटलेल्या अनेक व्यक्तींवर या ठिकाणी उपचार केले जातात. परंतु उपचारासोबत रुग्णांचे अंतर्गत कौशल्य शोधण्याचा प्रयत्न ही केला जातो आहे.
मनोरुग्णांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध थेराप्युटिक ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून उपचार दिले जातात. व्यवसाय उपचार पद्धतीच्या सहाय्याने मानसिक आजारपणामुळे कमी झालेल्या शारीरिक व बौद्धिक कौशल्यांवर भर देऊन मानसिक आरोग्य सुधारवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील पुरुष व्यवसाय उपचार विभागात स्टेशनरी साहित्या बरोबर पेंटिंग, शिवणकाम सारखे शिक्षण दिले जात असल्याची माहिती व्यवसाय उपचार तज्ज्ञ डॉ. पायल सुरपाम यांनी दिली.
रुग्णांनी तयार केलेल्या अनेक वस्तू ठाणेकरांच्या पसंतीला उतरताना दिसतात. सण उत्सवाच्या काळात लागणाऱ्या वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण मनोरुग्णांना दिलं जात आहे. तर वर्षभर रुग्णालयासाठी लागणाऱ्या फाईलस, रुग्णालयात लागणारे डिस्चार्ज कार्ड व खावटी खर्च कार्ड बनवत आहेत. स्टेशनरी तयार करण्यासाठी कच्च साहित्य आणून दिलं जात, त्यानंतर रुग्ण स्टेशनरी बनवत असल्याचे व्यवसाय उपचार तज्ञ डॉ.प्रियतम दंडवते म्हणाले
रुग्णालयात दर महिना पाचशे ते सहाशे फाईलस व तीनशे ते चारशे डिस्चार्ज कार्ड बनवले जातात या साहित्याचा उपयोग रुग्णालयीन तसेच कार्यालयीन कामकाजात केला जातो. यामुळे रुग्णालयावरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होते व रुग्णांच्या पुनर्वसनास मदत होते.
डॉ.अश्लेषा कोळी (व्यवसाय उपचार तज्ञ)
मनोरुग्ण लवकर बरा होऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात कसा येईल यासाठी रुग्णालयाचे प्रयत्न असतात. व्यवसाय उपचार थेरपीने रुग्णाची हात डोळे आणि मेंदू यांची सुसूत्रता, आकलन क्षमता, एकाग्रता, आत्मविश्वास वाढण्यासाठी मदत होते.
डॉ. नेताजी मुळीक (वैद्यकीय अधीक्षक, मनोरुग्णलय ठाणे)