नवी मुंबईकरांचा उत्साही सहभाग

नवी मुंबई : नवी मुंबई शहराच्या पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी नागरिकांच्या सहभागातून नवी मुंबई महानगरपालिका नानाविध उपक्रम राबवित असून शाश्वत पर्यावरण विकासाकडे वाटचाल करीत आहे. या अनुषंगाने नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 21 मे पासून नागरिकांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती करणारे पथनाट्य सादरीकरण, सोसायट्यांमध्ये कार्यशाळा अशा विविध उपक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे.

या अंतर्गत नागरिक शहराचे पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी कशा प्रकारे हातभार लावू शकतात याविषयी माहिती देणारी व त्यांना त्यासाठी प्रोत्साहित करणारी हस्तपत्रके छापण्यात आली असून त्याचे वितरण पर्यावरण स्वयंसेवकांमार्फत घराघरात जाऊन करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे नागरिक विरंगुळ्यासाठी येत असतात अशा जागा आणि नागरिकांची वर्दळ असते अशा ठिकाणी पर्यावरण जागृती स्टॉल लावून नागरिकांना माहिती दिली जात आहे. या सप्ताहभरात आठही विभागांमध्ये प्रत्येकी तीन ते चार मुख्य ठिकाणी हे किऑक्स लावण्यात आले असून नवी मुंबईकर नागरिकांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती करण्यात आली आहे.

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत राबविण्यात येणा-या या सर्वच उपक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याने त्यांची व्यापकता वाढवून त्यामध्ये सातत्य ठेवले जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त श्री. शिरिष आरदवाड यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *