कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सर्वतोपरी प्रयत्न व्हावेत- प्रियंक कांगजू

ठाणे : स्त्यावरील बालकांच्या समस्येबाबत समाजाने संवेदनशील होणे आवश्यक असून त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सर्वतोपरी प्रयत्न समाजातील सर्व घटकांकडून होणे अपेक्षित असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली चे अध्यक्ष श्री. प्रियंक कांगजू यांनी आज येथे केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात श्री.कांगजू यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील बाल हक्क संरक्षण विषयाबाबतची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक डॉ.डी.स्वामी, एनसीपीसीआर, नवी दिल्ली च्या मेजर श्रीमती रुपाली बॅनर्जी, ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड, जे.जे.बी. मेंबर, ठाणे स्वाती रणदिवे, कामगार उपायुक्त ठाणे लक्ष्मण सावंत, महिला व बाल कल्याण अधिकारी श्रीमती चारुशिला खरपडे, ठाणे महानगरपालिकेच्या उपायुक्त वर्षा दीक्षित, ठाणे मनपा चे दशरथ  वाघमारे, सहयोग ट्रस्ट अध्यक्ष विश्वकांत लोकरे, फिरते पथक अल्ताफ काजमी, मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या तेजश्री शिंदे, महिला व बाल कल्याण विकास प्रतिनिधी जि.प.ज्योती प्रकाश महाडीक आदि मान्यवर उपस्थित आहेत.

या बैठकीत प्रामुख्याने रस्त्यावरील मुले व त्यांचे कुटुंब यांच्या समस्यांविषयी चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येत असल्याचे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष श्री. प्रियंक कांगजू यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, वर्ष 2016 पासून या समस्येवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने केंद्र शासन, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली, राज्य शासन आणि विविध सामाजिक संस्था यांच्या एकत्रित समन्वयातून मार्गदर्शक कार्यपद्धती आखण्यात आली आहे. फक्त एका मुलाचे पुनर्वसन हा या समस्येवरील परिणामकारक उपाय नसून त्या मुलासोबत त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे शाश्वत पुनर्वसन गरजेचे आहे. जिल्ह्यातील महानगरपालिका व नगरपालिकांनी यासाठी सकारात्मक पुढाकार घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे रस्त्यावरील मुले व त्यांचे कुटुंब यांची आर्थिक क्षमता वाढविणे आवश्यक असून या मुलांना शाळेत भरती करणे देखील गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व समस्यांवर “सहकारी तत्त्वावरील निवारागृहे” हा एक परिणामकारक उपाय होवू शकतो, असेही त्यांनी सुचविले. याबाबत भोपाळ येथील प्रकल्पाचे त्यांनी उदाहरण दिले. ठाणे जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही सामाजिक संस्थांसह या प्रकल्पास भेट देवून तेथील कार्यपद्धतीचा अभ्यास करावा आणि ठाणे जिल्ह्यातही अशा प्रकारचा प्रकल्प उभारावा, असेही श्री. कांगजू यांनी सुचविले.

बैठकीच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी पुष्पगुच्छ देवून मान्यवरांचे स्वागत केले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री.महेंद्र गायकवाड यांनी महिला व बाल विकास विभागाने बाल हक्क संरक्षण संदर्भात केलेल्या कामकाजाची माहिती अध्यक्ष महोदयांना दिली. त्याबद्दल श्री.कांगजू व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व महिला बालविकास विभागाने केलेल्या कामांचे विशेष कौतुकही केले. शेवटी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. गायकवाड यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *