पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुढील तारखेला पुणेन्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी गुरुवारी दिले आहेत. राहुल यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांच्या तक्रारीत आढळलेले तथ्य आणि विश्रामबाग पोलिसांचा तपासणी अहवाल प्रथमदर्शनी ग्राह्य धरीत न्या6यालयाने हा आदेश दिला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या दाव्यात विश्रामबाग पोलिसांनी नुकताच तपासणी अहवाल न्यायालयात सादर केला. त्यामध्ये राहुल यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आले असून, या अहवालाच्या आधारे राहुल गांधी यांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम २०४ नुसार कार्यवाहीसाठी नोटीस बजावली जाणार आहे. त्यानुसार पुढील तारखेला पुणे न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
