ठाणे : मनुस्मृती प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठाण्यात निदर्शने करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फडल्या प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड तसेच मनुस्मृतीचे श्लोक शिक्षणाच्या पाठ्य पुस्तकात आणू पाहणाऱ्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि मनुस्मृतीची प्रतिमा फाडून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. ठाण्यातील कोर्ट नाका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यासमोर बुधवार (ता.३०) दुपारी हे आंदोलन झाले.

राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षणाच्या पाठ्यक्रमात मनुस्मृती मधील काही श्लोकचा समावेश करण्याचा निर्णय जाहीर करताच त्या विरोधात आंबेडकरी जनतेमध्ये रोष पसरल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे मनुस्मृती पुस्तकाचे दहन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडली. त्याविरोधात राज्यभरात संतापाचे वातावरण पसरले. वंचित बहुजन आघाडीने बुधवारी ठाण्यात निदर्शने केली. यावेळी आव्हाड यांच्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मनुस्मृती यांच्या प्रतिमा झळकावून त्या फाडण्यात आल्या. आमदार जितेंद्र आव्हाड हे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, पण त्याचसोबत पाठ्यक्रमात मनुवाद घुसवणे हे देखील निषेधार्थ आहे. त्यामुळे हे सरकारही आंबेडकर आणि संविधान द्रोही असल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष भोला मंडल, शरणंम् फाऊंडेशन चे अध्यक्ष सिद्धार्थ जाधव यांनी केली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे ठाणे शहर जिल्हा उप अध्यक्ष भोला मंडल, शरणं संस्थेचे अध्यक्ष सिद्धार्थ जाधव, उद्धव पळसपगार, सुनील कांबळे, भास्कर जाधव, साबळेताई, सोमनाथ पाटील, फुलचंद हौसमल, सुनील कडाळे, उषा काटे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे नगर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *