ठाणे : महाराष्ट्र कापूस बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु शेतकऱ्यांनी कापसाच्या विशिष्ट वाणांसाठी आग्रह धरु नये, असे आवाहन कृषी संचालक (निविष्ठ व गुण नियंत्रण) विकास पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
महाराष्ट्र राज्यात कापूस पीक क्षेत्र 40.20 लाख हेक्टर आहे. कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार प्रति हेक्टर 4.2 पाकिटे बियाण्याची आवश्यकता असते. या क्षेत्रासाठी 1 कोटी 70 लाख पाकिटाची आवश्यकता आहे. सर्व कंपन्यांचा आढावा घेतला असता, साधारपणे 1.75 कोटी पाकिटे उपलब्ध आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कापूस बियाण्याची कमतरता नाही. महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांमध्ये कापसाच्या काही वाणांना विशेष मागणी आहे. परंतु त्याबरोबर इतर कंपन्यांचे कापसाचे वाण सुद्धा अतिशय चांगले उत्पादन देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस पिकाच्या ठराविक वाणांचीच मागणी करू नये, याबाबत कृषि विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.
केंद्र सरकारने खरीप 2024 साठी कापूस BG II चा दर 864 रुपये निश्चित केला आहे. कापूस बियाणे जादा दराने विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्र तसेच कापूस उत्पादक कंपनी यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश संचालक (निविष्ठा व गुण नियंत्रण) यांच्यामार्फत आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच काही ठिकाणी कापूस जादा दराने विक्री केली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कृषी विभागातील स्थानिक कृषी सहाय्यक यांच्या मदतीने संबंधित कापूस बियाण्याचे वाटप कृषी विभागाच्या कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केलेले आहे.
महाराष्ट्र राज्यात एकूण एच.टी. बीटी कापूस बियाणेबाबत चंद्रपूर जिल्ह्यात चार ठिकाणी कारवाई करण्यात आल्या. त्यामध्ये 4568.30 किलो (एकूण किमत 66.85 लाख) बियाणे साठा जप्त करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यात 30 क्विंटल बियाणे जप्त करण्यात आले. तसेच नंदुरबार व धुळे जिल्ह्यात तीन ठिकाणच्या कारवाईत 1807 एच.टी.बीटी कापूस बियाणे पाकिटे (37.96 लाख किमतीचे) साठा जप्त करण्यात आला. अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यात तीन ठिकाणी 113 बियाणे पाकिटे जप्त करण्यात आली असून त्याची किमत 1.55 लाख रुपये आहे. सर्व जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर भरारी पथकामार्फत मोहिम स्वरुपात तपासणी करण्यात आली असून त्याअनुषंगाने दोषींवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती कृषी संचालक (निविष्ठ व गुण नियंत्रण) विकास पाटील यांनी कळविली आहे.
