सोशल मीडियावर एक गुणपत्रक चांगलेच व्हायरल झाले आहे. त्यामध्ये विद्यार्थ्याला गणितात 200 पैकी 212 तर गुजरातीमध्ये 200 पैकी 211 गुण दिले आहेत. हे गुण पाहिल्यावर अनेकांना धक्का बसला. पालकांनी ही चूक शाळेच्या लक्षात आणून दिल्यानंतर मार्कशीटमध्ये सुधारणा करुन नवीन गुणपत्रक देण्यात आले. तसेच शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील कृष्णा या गावातील हे गुणपत्रक आहे. चौथी वर्गात शिकणाऱ्या वंशीबेन मनीषभाई हिचा हा निकाल आहे. तिचा हा निकाल पाहून कुटुंब आणि मित्र परिवारास आश्चर्याचा धक्का बसला. कारण वंशीबेनला गुजराती विषयामध्ये 200 पैकी 211 तर गणित विषयामध्ये 200 पैकी 212 गुण मिळाले. शाळेच्या लक्षात हा प्रकार आणून दिल्यानंतर नवीन मार्कशीट तिला देण्यात आले.
नवीन गुणपत्रकातील बदलानुसार तिला गुजरातीमध्ये 200 पैकी 191 आणि गणितामध्ये 190 गुण मिळाले. बाकी विषयामध्ये काहीच बदल झाले नाही. एकूण एक हजारपैकी 934 गुण तिला दिले आहे. हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले.
लग्नाला या; परंतु अटी पाळा!
साधारणपणे लग्नसमारंभात पाहुण्यांना खूप आदराने वागवले जाते; पण त्यांचे लग्न अविस्मरणीय बनवण्यासाठी एका जोडप्याने असे काही केले, ज्याची सध्या सोशल मीडियावरून जगभरात चर्चा झाली. या ब्रिटीश जोडप्याने पाहुण्यांसमोर अशा अटी ठेवल्या, की बहुतेक लोकांनी लग्नाला येण्याचा बेत रद्द केला.
या जोडप्याने छापलेली लग्नपत्रिका वाचून पाहुण्यांना धक्काच बसला. लग्नपत्रिकेत लिहिले आहे त्यानुसार, पाहुणे जोडप्याच्या काही अटी मान्य करण्यास तयार असतील तर ते लग्नाला उपस्थित राहू शकतात. आता हे विचित्र कार्ड सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. या जोडप्याचे नाव समोर आलेले नाही; परंतु रेडिटवर त्यांच्या लग्नाच्या कार्डची जोरदार चर्चा सुरू आहे. एका युजरने लग्नपत्रिकेचा फोटो शेअर केला आणि लिहिले, कोणी मला असे आमंत्रित केले, तर मी अजिबात जाणार नाही. लग्नपत्रिकेत पाहुण्यांसाठी एक, दोन नव्हे तर 15 अटी लिहिल्या आहेत. त्या वाचून लोक संतापले आहेत आणि हे आमंत्रण आहे की धमकी आहे, असा सवाल करत आहेत.
या जोडप्याने पाहुण्यांना स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की, हा त्यांचा खास दिवस आहे, तुमचा नाही. यानंतर, अनेक नियम स्पष्ट लिहिले आहेत. थीम ड्रेसशिवाय दुसरे काहीही परिधान करण्याची चूक करू नका. त्याचबरोबर छायाचित्रकाराच्या आड येऊ नका. बसण्यास सांगितले असलेल्याच जागी बसावे. या जोडप्याने असेही म्हटले आहे की कोणाला संगीत आवडत नसेल तर तो उठून घराचा रस्ता शोधू शकतो. याशिवाय इतरही अनेक अटी आहेत, त्या वाचून पाहुण्यांचे मन गोंधळून गेले.
सहा कोटी पगार, तरी नोकरीला नकार!
सध्याच्या जमान्यात वाढत्या लोकसंख्येमुळे नोकऱ्या कमी होत चालल्या आहेत. काही काळापूर्वी पुण्यातून एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात वॉक इन इंटरव्यूसाठी तीन हजारपेक्षा जास्त इंजिनिअर्सनी गर्दी केली होती. असेच दृश्य मागच्या वर्षी हैदराबादमध्ये पाहायला मिळाले. या अशा स्थितीमध्ये समजा एखाद्याला सहा कोटी पगार आणि राहण्यासाठी फ्रीमध्ये घर मिळत असेल, तर तो नोकरीसाठी नक्कीच अर्ज करेलच. ऑस्ट्रेलियातील अशीच एक नोकरीची जाहीरात चर्चेत होती; पण आता त्यांना उमेदवार मिळाला आहे. पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये कॅराडग नावाचे एक गाव आहे. इथे बहुतांश लोक शेतीवर अवलंबून आहेत. इथे कोणी डॉक्टर नाही. हे गाव शहरापासून खूप लांब आहे. त्यामुळे इथे डॉक्टर यायला तयार नसतात. इथे एक जनरल प्रॅक्टिशनर होते, त्यांचा करार मार्चमध्ये संपला.
तेव्हापासून या गावात दुसरा डॉक्टर आलेला नाही. अशावेळी स्थानिक प्रशासनाने डॉक्टरसाठी एक मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे 6 कोटी रुपये आणि राहण्यासाठी चार खोल्यांचे घर असे पॅकेज ऑफर केले; मात्र तरीही कोणी अर्ज केला नाही. कारण एकच होते, शहरापासून खूप लांब अंतर.
अखेर जानेवारी 2024 मध्ये 600 लोकसंख्येच्या या गावाला डॉक्टर मिळाला. स्थानिक नगरसेवकाने सांगितले, की आकर्षक ऑफरमुळे काही लोकांनी अर्ज केला होता. त्यातून व्यवस्थित पडताळणी करुन एकाची निवड केली. एका रिपोर्ट्नुसार, ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य प्रणालीला डॉक्टरच्या कमतरतेचा सामना करावा लागतो आहे. खासकरून जनरल प्रॅक्टिशनर्स मिळत नाहीत. 2030 पर्यंत 9,298 पूर्णवेळ जनरल प्रॅक्टिशनर्सची गरज लागेल. म्हणूनच ऑस्ट्रेलियामध्ये डॉक्टर्सना घसघशीत पॅकेजची ऑफर दिली जाते.