शिवसेनेच्या शिष्यमंडळाने घेतली पालिका आयुक्तांची भेट
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील कामे डेडलाईन उलटले तरी अजून शिल्लकच असलेली दिसून येत आहेत. त्यामूळे आगामी पावसाळ्यात ठाणे तुंबणार नाही याकडे पालिका प्रशासनाने लक्ष घालून मान्सूनपूर्व कामे तत्काळ पूर्ण करावीत अशी मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे) नेते राजन विचारे यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली. माजी नगरसेवक आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्त यांची आज भेट घेण्यात आली त्यावेळी विचारे यांनी पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याची मागणी केली.
त्यावेळी संपर्कप्रमुख नरेश मणेरा, माजी नगरसेवक संजय दळवी, विभाग उपशहर प्रमुख वसंत गवाळे, विभाग प्रमुख प्रतिक राणे, स्वप्नील शिरकर, प्रकाश पायरे, जीवाजी कदम, व्यंकट कांबळे, राजू शिरोडकर, शाखाप्रमुख शशिकांत कालगुडे, ज्येष्ठ शिवसैनिक शांताराम शिंदे, जगन्नाथ तावडे. व इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते
ठाणे शहरातील नाल्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर असून नालेसफाई झालीच नसल्याचा दावा केला. पावसाळा तोंडावर आला असताना लवकरात लवकर नाले स्वच्छ करावे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याने योग्य उपायोजना कराव्यात, प्रभाग समिती निहाय ठाणे महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन टीम तयार करावी, तसेच ठाणे आपत्ती व्यवस्थापनकडे यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळ वाढवावे. त्याचबरोबर ठाणे महापालिकेची टीडीआरएफ च्या टीम मध्ये असलेल्या ३० जवानांचा पालिकेच्या सेवत कायम स्वरुपी नोकरीचा प्रश्न आचारसंहिता संपताच तत्काळ सोडवावा. शहरातील रस्त्याच्या कडेला असलेली झाडांच्या फांद्या तात्काळ छाटाव्यात तसेच सोसायटीच्या आवारात असलेल्या झाडांकडे लक्ष घालावे. एमएसईबी च्या अधिकाऱ्यांशी संगनमत ठेवून उघड्यावर असलेल्या डीपी आणि वायर याकडे लक्ष घालावे जेणेकरून कोणती मोठी दुर्घटना होणार नाही अश्या आणि इतर गोष्टीकडे पालिका प्रशासनाने तत्काळ लक्ष घालावे असे सूचना विचारे यांनी यावेळी केल्या.
ठाण्याला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री गावी रमलेत
पावसाळा काही दिवसावर झाला असून ठाण्यात बरीच कामे अर्धवट राहिले असल्याचे विचारे यांनी नाराजी व्यक्त केली. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री मुंबईत ग्रीन कार्पेट वरून नालेसफाईची पाहणी करतात. मात्र, ठाणे वाऱ्यावर सोडून गावी लावलेली झाडे वाढली आहेत का हे पाहण्यासाठी मुख्यमंत्री गावी रमले असल्याचा टोला विचारे यांनी लगावला.
६० टक्के नालेसफाईच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह
ठाण्यात रस्त्याची कामे सुरु असून पावसाळा पूर्वी हे कामे होतील का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्तित झाला आहे. शहरात ६० टक्के नाले स्वच्छ केली असल्याचा दावा पालिकेने केला आहे. त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला असला तरी मोठय़ा नाल्यांची सफाई अद्याप पूर्ण झालेली नाही. धोकादायक वृक्ष तोडणीची कामेही सुरू आहेत. तर अनेक ठिकाणी उघडय़ा वीजवाहिन्या तसेच दरवाजे नसलेल्या वीजपेटय़ांची तातडीने दुरुस्ती मोहीम हाती घ्यावी, असे आयुक्तांनी सांगितले होते. तसेच पावसाळ्यात ठाणे शहरात ज्या सखल भागात पाणी साचले जाते त्या ठिकाणी पंपाची योजना करावी अशी मागणी विचारे यांनी केली.
आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास सज्ज ठेवावे
धोकादायक तसेच अतिधोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे तत्काळ स्थलांतरित करून महापालिका हद्दीतील डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे, जेणेकरून दरड कोसळणाऱ्या घटना घडल्यास जीवितहानी होणार नाही यांची नोंद घ्यावी. तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास सज्ज ठेवावे आणि ठाणेकरांना तत्काळ संपर्क साधता यावा यासाठी फोन क्रमांक प्रसिद्ध करावे.
ठाण्यातील सर्व अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करा
ठाणे शहरातील ज्यांच्या होर्डिंगच्या परवाना संपल्या आहेत किवा विनापरवाना ज्या होर्डिंग उभ्या केल्या आहेत त्या होर्डिंग काढून टाकाव्यात. त्याचबरोबर रीतसर परवाना घेतलेल्या होर्डिंगच्या साईज प्रमाणे नसलेल्या होर्डिंग वर कारवाई करून त्यांच्याकडून दंड आकारून वरील वाढीव असणारे स्ट्रक्चर तत्काळ काढून टाकण्यात यावे अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी केली आहे.
घोडबंदर मार्गावरील सर्विस रोड रस्ता मुख्य रस्त्यात समावेश करण्याचे काम थांबवा
घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कापूरबावडी ते गायमुख पर्यंतच्या दोन्ही बाजू (सर्व्हिस रोड) सेवा रस्त्यांचा समावेश घोडबंदरच्या मुख्य रस्त्यात करण्याचा निर्णय रद्द करणे बाबत कारण या घोडबंदर परिसरात नागरिक वस्ती अधिक वाढल्याने नागरिकांसाठी सर्विस रोडची अत्यंत आवश्यकता भासते.
ठाणे रेल्वे स्थानकातील ५ /६ व्या फलाटच्या रुंदीकरणाच्या सुरू असलेल्या कामाला भेट
मध्य रेल्वे ठाणे रेल्वे स्थानकात ५/६ फलाटांच्या रुंदीकरणाचा कामाला सुरुवात केली यासाठी मध्य रेल्वेवर ६८ तासाचा मेगाब्लॉक घेऊन Precast segmental RCC चे ७८५ बॉक्स बसविण्याचे काम सुरू असताना ते बघण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकाला आज भेट दिली या मेघा ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होऊ नये मनपा आयुकांना भेट घेऊन मुंबई व कल्याण दिशेला जाण्यासाठी बसेस ची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.