काहीतरी नवीन…
श्याम तारे
ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणेला असलेल्या मोनॅश विद्यापीठाने बदलत्या पाळ्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या बद्दल एक अभ्यास पाहणी केली. हे सगळे लोक आलटून पालटून येणाऱ्या दिवस आणि रात्र पाळीमध्ये काम करणारे लोक होते. त्यांच्या अभ्यासातून जो पहिला निष्कर्ष निघाला तो असा की त्याचे भोजन हे सामान्य काम करणाऱ्या लोकांपेक्षा अधिक होते. ऊर्जेच्या बाबतीत ही अधिकता २६४ हजार किलोजूल्स म्हणजे साधारण ४० कॅलरी इतकी होती.
यावर बोलताना अभ्यासाच्या प्रमुख संशोधक अँजेला क्लार्क म्हणतात की एवढ्या कॅलरी म्हणजे दिवसभरात ओंजळभर बटाट्याचे काप खाण्यासारखे आहे परणतु जरी आपण रोज १५ कॅलरी जास्त घेतल्या तरी वर्षभरात आपले वजन अर्घा किलो वाढू शकते आणि त्यामधून मधुमेह इत्यादी रोगांचा त्रास होऊ शकतो. असा निष्कर्ष निघाल्यामुळे पालीची कामे करणाऱ्या लोकांच्या आरोग्याच्या बाबतीत एक नवा धोका समोर आला आहे. साहजिकच यामध्ये पोलीस दलात काम करणारे, विविध हॉस्पिटल्स मध्ये काम करणारे डॉक्टर्स आणि परिचारिका तसेच इतर लोक, वसाहतींमध्ये काम करणारे सुरक्षा रक्षक आणि इमारत अथवा उद्योग निर्मितीच्या क्षेत्रातील कामगार देखील येतात.
पाळ्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना हृदय रोग, विस्मरण किंवा मानसिक आजार यांची जास्त शक्यता असते आणि त्यातूनच त्यांचे आयुष्यमान कमी होऊ शकते. इतकेच नव्हे तर कर्करोगावर संशोधन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनेने पाळीतील कामाला ‘गट २ अ कर्करोग’ या नावाने धोका ठरवला आहे परंतु यावर अजून निश्चित असे सांगितले गेले नाहीय.
तसे बघायला गेले तर उठायचे आणि झोपायचे याच्या वेळाच तर बदलतात असे म्हटले जाईल परंतु आपल्या शरीराच्या क्रिया या शरीराच्या अंतर्गत घड्याळानुसार सुरु असतात. प्रत्येक दिवस म्हणजे २४ तासांमधील या वेळा आपल्या शरीराची लय ठरवतात आणि त्यावर आपली झोप, तापमान, चयापचय, अनुभूती आणि इतर बाबी अवलंबून असतात. ही लय रात्रपाळी करीत असताना बिघडते असे टर्नर मेंदू आणि मानसिक आजार संस्थेचे डॉ. ट्रेसी स्लेटन यांचे मत आहे.
“रात्रपाळीत काम करीत असताना आपण पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही आणि रात्रीच्या वेळी आपण काम करीत राहिलो तर आपली विचार करण्याची क्षमता सुद्धा कमी होऊ शकते. आपण परिणामकारक निर्णय घेऊ शकत नाही असेही पाहिले गेले आहे.” असे त्या म्हणाल्या.
मग प्रश्न असा उभा राहतो की पाळीची पद्धत दुरुस्त होऊ शकणार नाही का?
क्वीन्सलँड विद्यापीठातील शरीरशास्त्र आणि शरीराची लय या विषयाचे प्राध्यापक फ्रेड गाचोन म्हणतात की रात्रीच्या पाळीत काम करायचेच असेल तर किमान ‘नियमित’ बदलणाऱ्यापाळ्या तरी असू नयेत असे त्यांचे म्हणणे आहे.
भारताच्या बाबतीत बघायचे झाले तर आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या आकडेवारीनुसार येथे किमान ४० टक्के कामगार पाळीमध्ये काम करतात. अर्थातच जी क्षेत्रे २४ तास कार्यरत असतात त्या ठिकाणी पाळीमध्ये काम करणे अनिवार्य असते. रात्रपाळीवर जाणाऱ्या लोकांनी घरून निघण्याच्या किमान तीन तास अगोदर भोजन करावे आणि शक्यतो रात्री कॉफी पिऊ नये असेही सांगितले गेले आहे.