विशेष
चंद्रशेखर जोशी
राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांनी खालच्या पातळीवरून एकमेकांना लक्ष्य करावे हे देशातील राजकारणाचा दर्जा किती घसरला आहे दाखवणारे आहे. काँग्रेसचे मणीशंकर अय्यर असोत वा दिग्विजयसिंह, भाजपातील गिरीराजसिंह आणि शिवसेनेचे संजय राऊत या वाचाळवीरांच्या वक्तव्यांना किती महत्व द्यायचे याचे भान न राखल्याने आरोप-प्रत्यारोप, हेत्वारोप होऊन राजकीय वातावरण गढूळ होत असते. भारताच्या परराष्ट्र सचिवपदी राहिलेल्या मणीशंकर अय्यर यांचा कार्यकाळ तसा वादग्रस्तच राहिलेला आहे. राजीव गांधी हे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्यासोबत सॅम पित्रोदा यांच्यासारखे तंत्रज्ञ जसे राजकारणात आले तसे मणीशंकरांसारखे काही फुटके मणीही आले. अन् अल्पावधीतच शिरजोर होऊन बसले. ते पक्षाला उपयुक्त असण्यापेक्षा हानीकारक किती आहेत याचा अनुभव गेल्या पाच-दहा वर्षात काँग्रेसने पुरेपूर घेतला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची सुबुद्धी सोडा त्यांची वक्तव्ये वैयक्तिक आहेत, काँग्रेस पक्षाशी त्याचा संबंध नाही असे सांगून शतकोत्तर वर्षाचा हा पक्ष हात झटकून टाकत असतो. भारतीय लोकांची चेहरेपट्टी आफ्रिकन असल्याचा जावईशोध लावून सॅम पित्रोदा यांनी कारण नसताना अव्यापारेषु व्यापार केला. त्याचा धुरळा खाली बसत नाही तोच मणीशंकर अय्यर यांनी १९६२च्या चीन आक्रमणावर अनाहूत मल्लीनाथी केली आणि काँग्रेस पक्षाला पुन्हा अडचणीत आणले. चीन युध्दाला कथित आक्रमण असे संबोधून अय्यर यांनी नवा वाद ओढवून तर घेतलाच पण पक्षाच्या चीनविषयक धोरणाबाबतचा संशय अधिक गडद केला. १९६२च्या चिनी आक्रमणावर चीनच्या अनुकूल भूमिका घेऊन भारतातील कम्युनिस्ट पक्षाने आधीच भारतीयांची मने दुखावली आहेत. त्यात आता काँग्रेसी नेते चीनधार्जिणे होत चालले आहहेत. चीनचे आक्रमण ही भारतीयांच्या मनातील ठसठसणारी जखम आहे याची जयराम रमेश यांच्यासारख्या काँग्रेसजनांना जाणीव असल्यामुळे त्यांनी अय्यर यांच्या वक्तव्यापासून तडकाफडकी फारकत घेतली. स्वतः अय्यर यांनीही माफी मागितली पण राजकीय नुकसान व्हायचे ते होऊन गेलेच.
कोठल्याही देशातील परराष्ट्र खाते हे अत्यंत संवेदनशील समजले जाते. परराष्ट्रमंत्री वा परराष्ट्र सचिव यांनी अतिशय मोजके बोलावे, धोरणविषयक वक्तव्ये काळजीपूर्वक करावित असे संकेत आहेत, रिवाज आहे. पण मणीशंकर अय्यर यांना त्याची पर्वा नाही. पदावर असताना आणि निवृत्त झाल्यावरसुद्धा त्यांच्या वादग्रस्त विधानांना खंड नाही. केन्द्रात काँग्रेसचे सरकार जाऊन नरेन्द्र मोदी सत्तेवर आल्यावर तरी त्यांनी आपल्या तोंडाला आणि कार्यशैलीला लगाम घालायला हवा होता. परंतु परराष्ट्र संबंध कसे सांभाळायचे हे आपल्यालाच कळते या गुर्मीत ते वावरत असतात. चार पाच वर्षांपूर्वी त्यांनी भारताच्या राजधानीत पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद कसुरी आणि पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त सोहेल महमूद यांच्या सन्मानार्थ एक भोजन समारंभ आयोजित केला होता आणि त्याला माजी उपराष्ट्रपती अन्सारी, मनमोहनसिंग व इतर काहींना बोलाविले होते. भोजन समारंभाविषयी कोणाची हरकत असण्याचे कारण नाही. पण प्रश्न आहे तो औचित्याचा. ज्या देशाबरोबरचे संबंध तणावपूर्ण आहेत त्या देशाच्या उच्चायुक्ताला परस्पर मेजवानी देण्याचा अव्यापारेषु व्यापार करण्याची आपल्या माजी परराष्ट्र सचिवाला गरज काय होती? बरे त्यांनी तसे आयोजन केले तरी उपराष्ट्पती, पंतप्रधानपद भूषविलेल्या व्यक्तींनी त्याला उपस्थित राहावे का? मुळात असे समारंभ करायचे असल्यास त्याची पुरेशी कल्पना देशाच्या परराष्ट्र खात्याला द्यायची असते. ती दिली नव्हती. देशाचे परराष्ट्रमंत्री, त्यांचे खाते उभय देशातील संबंधांबाबत निर्णय घेण्यास सक्षम असताना माजी परराष्ट् सचिवाने त्यात नाक खुपसण्याचे कारण नव्हते. त्यांना जर दोन देशांच्या संबंधांबाबत एवढीच काळजी आहे तर त्यांनी परराष्ट्र खात्यास तसे कळवणे गरजेचे होते. संबंधित खात्याला कळवणे हा निव्वळ उपचाराचा भाग असून चालणारे नाही तर तो नियमच असायला हवा. उद्या कोणीही उठेल आणि चीनच्या राजदूताशी बोलणी करू लागेल. हे व्यवस्थेला सुरूंग लावण्यासारखे आहे. पाकिस्तान जोवर दहशतवादाला खतपाणी घालणे थांबवत नाही तोवर त्याच्याशी चर्चा नाही असे भारताचे सध्याचे धोरण आहे. असे असताना पाक उच्चायुक्तांशी चर्चा करण्याची गरज का भासली, याचे उत्तर काँग्रेसने द्यायला हवे, असे तेव्हाचे केंद्रीयमंत्री अरुण जेटली यांनी जे म्हटले होते. पण काँग्रेस नेत्यांनी सोयीस्कर मौन बाळगले. मणीशंकर यांचे हे उपद्व्याप एवढ्यावर थांबले असे नाही. मध्यंतरी त्यांनी पाकिस्तानकडे अणुबाँम्ब आहे तेव्हा भारताने पाकशी पंगा घेऊ नये असे सुचवले. पाकिस्तानकडे अणुबाँम्ब आहे हे काय भारत सरकारला माहिती नाही? अन् भारताकडले अणुबाँम्ब काय शोभेपुरते आहेत? अय्यर यांना पाकिस्तानचा एवढा पुळका का आहे हे कळत नाही. गेल्यावर्षी पाकिस्तानात जाऊन त्यांनी नरेन्द्र मोदी यांचा पराभव करण्यासाठी पाकिस्तानने मदत करावी अशी जाहीरपणे गळ घातली होती. त्यांची ही वक्तव्ये, नवनवे वाद यामागे कोणती मानसिकता आहे हे उघड आहे.
भारतातील दोन मोठे पक्ष आपसात भांडताहेत हे बघून पाकिस्तानी नेते खुशीची गाजरे खाणार हे उघड आहे. नव्हे, काँग्रेस- भाजपाने आपापले ते काय बघून घ्यावे पाकिस्तानला त्यात ओढून निवडणुका लढवू नयेत असे शहाजोगपणे सांगण्यासही ते विसरले नव्हते. शत्रुराष्ट्र असलेल्या पाकिस्तानकडून असा मुखभंग करून घेण्याला काय म्हणायचे ते काँग्रेसनेच ठरवावे. क्षुल्लक स्वार्थासाठी देशाची प्रतिष्ठा पणाला लावू नये. आपण तेवढे शहाणे आणि बाकी निर्बुद्ध अशा पुस्तकी आविर्भावात राहणा-या अय्यरांसारख्या व्यक्ती सदान् कदा दुस-याच्या अन् त्यातही विरोधकांच्या चुका शोधत राहतात. त्यांचे राजकीय कर्तृत्व दुस-याला पाण्यात पाहण्यापुरतेच मर्यादित. ज्यांना आपल्या मतदारसंघात चार माणसे गोळा करता येत नाहीत अशा फुटक्या मण्यांना जवळ करणे, नेते म्हणणे हे चूक, अन् नेते बनवणे तर त्याहून चूक. हे लक्षात येऊनही जर त्यांना घरी बसवले जात नसेल तर, परपीडेवर आनंद मानणारी ही उपदव्यापी मंडळी, पक्षाला अडचणीत आणणारा अव्यापारेषु व्यापार करीतच राहणार.