ठाणे : मध्य रेल्वेवर ठाणे स्टेशनवर घेण्यात आलेल्या ६२ तासांच्या तीन दिवसीय मेगा ब्लॉक आणि त्याचसोबत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल म्हणजे सीएसएमटीवरही घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे नोकरदार वर्गाने आज ‘वर्क फ्रॉम होम’ला पसंदी दिली. परिणामी या मेगाब्लॉकमुळे रद्द करण्यात आलेल्या रेल्वे फेऱ्यांचा त्रास नोकरदार वर्गाला होऊ नये यासाठी पर्याय म्हणून ठाणे परिवहन विभागाच्या वतीने विशेष बस गाड्या सोडण्यात आल्या पण त्याला अल्प प्रतिसाद मिळाला.
परंतू, मेगाब्लॅाकची पूर्व सुचना असल्यामुळे अनेक नोकरदारांनी घरातून काम करणे पसंत केले तर, काहींनी स्वत:च्या वाहनांनी कार्यालय गाठले. त्यामुळे या बस गाड्यांना प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र होते.
मध्ये रेल्वेच्या वतीने मेगाब्लॉक बाबतची पूर्व सुचना प्रवाशांना आधी देण्यात आली होती. तसेच या मेगाब्लॅाकचा परिणाम प्रवाशांवर होऊ नये यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला ज्यादा गाड्या सोडण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार, ठाणे परिवहन विभागाने ज्यादा गाड्यांचे नियोजन केले आहे. त्यानुसार, ठाणे परिवहन विभागाकडून ५० ज्यादा गाड्या दिवा, डोंबिवली, कल्याण, मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गावर सोडण्यात आल्या आहेत. शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून ठाणे पश्चिम सॅटील पुलावरुन या गाड्या सोडल्या जात आहेत. परंतू, मध्य रेल्वेकडून मेगाब्लाॅकची पूर्व सुचना दिल्यामुळे अनेक कार्यालयांनी जे कर्मचारी मध्य रेल्वेने प्रवास करुन कार्यालय गाठतात, अशा कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची सुचना दिली. तर, काही नोकरदारांनी स्वत:च्या किंवा खासगी वाहनाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. परिणामी, परिवहन विभागाकडून सोडण्यात आलेल्या ज्यादा बस गाड्यांसाठी प्रवाशांची फार गर्दी नसल्याचे दिसून आले.
मेगाब्लॉकमुळे ठाणे परिवहन विभागाकडून ज्यादा बस गाड्या सोडण्यात आल्या. परंतू, या बस गाड्या नेहमीच्या मार्गावरील काही फेऱ्या रद्द करुन सोडल्या तर, नाही ना असा प्रश्न ठाण्यात काम करणाऱ्या नोकरदारांमध्ये निर्माण झाला होता. कारण, या फेऱ्यांमुळे शहरांतर्गत वाहतूकीवर परिणाम होईल अशी शक्यता काही प्रवाशांच्या मनात आली होती. मात्र, ठाणे शहरात दररोज ३०० ते ३५० बस गाड्या वेगवेगळ्या मार्गावर धावतात. या नेहमीच्या बस गाड्या व्यतिरिक्त ५० ज्यादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे शहरांतर्गत वाहतुक व्यवस्थेवर याचा कोणताही परिणाम झाला नाही, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली.