ठाणे : क्रिकेटप्रेमी ठाणेकर आणि सेंट्रल मैदान यांचे नाते १९२४ ते २०२४ असे गेली १०० वर्षे अतूट राहिले आहे आणि भविष्यातही ते अबाधित राहणार याची मला खात्री आहे.  बी.सी,सी.आय  आणि एमसीआय या संस्थांच्या आधी स्पोर्टींग क्लब कमिटीच्या माध्यमातून ठाण्यात क्रिकेट रुजवले आणि वाढवले. शेणाने सारवलेली  विकेट अशी स्थित्यतरे या मध्यवर्ती मैदानाने पहिली आणि अनुभवली. शतकपूर्तीचा योग माझ्या अध्यक्षीय कारकिर्दीत जरी आला असला तरी या आगळ्या आनंदाचे आपणही सारे भागीदार आहात.साक्षीदार असल्याचे शतकपूर्ती करणाऱ्या स्पोर्टींग क्लब कमिटीचे अध्यक्ष डॉ राजेश मढवी यांनी सांगितले.

२०२३-२०२४ हे क्रीडा वर्ष  स्पोर्टींग क्लब कमिटीसाठी अत्यंत फलदायी ठरले आहे.मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त महिलांसाठी क्रिकेट स्पर्धा हि मुंबईसह ठाणे, कल्याण,भिवंडी, नवी मुंबई आणि विरारसाठी मानबिंदू ठरली आहे. खंडेराव रांगणेकर पुरुष एकेरी क्रिकेट स्पर्धा गेली ३७ वर्ष सुरु आहे. या स्पर्धेला तीन वर्षांपूर्वी महिला एकेरी क्रिकेट स्पर्धेची जोड दिली, अशी स्पर्धा विरळच.

६७ वी शामराव ठोसर उपनगरीय क्रिकेट स्पर्धा  उपनगरीय स्पर्धामध्ये प्रतिष्ठेची मानली जाते. गेली काही वर्षांपासून इतर उपनगरीय स्पर्धा टी २० स्वरूपात होत असताना शामराव ठोसर स्पर्धा मात्र ४५ षटकांचीच खेळली जात आहे. खंडेराव रांगणेकर एकेरी विकेट क्रिकेट स्पर्धा आणि डॉ श्रीधर देशपांडे स्मृती समरलीग क्रिकेट स्पर्धा ३७ वर्षांपूर्वी सुरु करण्यात आल्या.

शताब्दी वर्षाचे औचित्य साधून यंदा विविध वयोगटाच्या शताब्दी चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या सर्व स्पर्धाना ठाणे जिल्ह्यातील युवक आणि युवतींचा चांगला प्रतिसाद मिळाला. सर्व स्पर्धांचा संयुक्त पारितोषिक वितरण समारंभ आणि स्नेहभोजन आतापर्यंत एकाच दिवशी होत असे यावेळी मात्र हे दोन्ही कार्यक्रम वेगवेगळे होणार आहेत. ठाण्याचे माजी रणजीपटू मयूर कद्रेकर यांच्या उपस्थितीत शनिवारी पारितोषिक वितरण समारंभ स्पोर्टींग क्लब कमिटीच्या प्रांगणात होईल.  या कार्यक्रमादरम्यान स्पोर्टींग क्लब कमिटीच्या शतकी वाटचालीचा आढावा घेण्यात येणार आहे. याशिवाय क्लबच्या जेष्ठ सदस्यांना गौरवण्यात येणार असल्याचे क्लबचे कार्यवाह दिलीप धुमाळ व सहकार्यवाह सुशील म्हापुसकर  यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *