देशभरात ५४ जणांचा उष्माघातामुळे मृत्यू
नवी दिल्ली : भर उन्हात जर बाहेर पडत असाल तर सावधान ! देशभरात दिवसागणिक उष्णतेची लाट वाढत असून आतापर्यंत उष्माघाताने ५४ लोकांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या तापमानामुळे हवामान खात्याने नागरिकांना सावधगिरी बाळगण्यासाठी अलर्ट जाहिर केला आहे. दरम्यान दिल्लीत शंभर वर्षांतील सर्वाधिक असे विक्रमी ५२.३ सेल्सियस तापमान मोजले गेले होते. त्यानंतर आज नागपुरात ५६ अंश सेल्सियसची नोंद झाल्याची चर्चा होती. पण दिवसअखेर तापमापीतील बिघाडामुळे हो घोळ झाल्याचा हवामान खात्याने स्पष्ट केले.
मध्य, ईशान्य, आणि उत्तर भारतातील अनेक ठिकाणी उष्णतेची लाट जाणवत आहे. यामुळे अनेकजण उष्माघाताचे बळी पडत आहेत. उत्तर भारतात अनेक ठिकाणी ४५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. दि. ३१ मे ते १ जून दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये आणि ३१ मे रोजी हरियाणा, चंदीगढ आणइ दिल्लीत धुळीचे वादळ धडकणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ३१ मे ते २ जून दरम्यान वायव्य भारतातील मैदानी भागात गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासंह हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे. दिल्लीमध्ये गुरुवारी सर्वाधिक ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सामान्य तापमानापेक्षा यामध्ये ५.२ सेल्सिअसची अधिक भर आहे. राजधानी दिल्लीमध्ये पहिल्यांदाच ७९ वर्षांचा उच्च तापमानाचा विक्रम यानिमित्ताने मोडीत निघाला आहे.
बिहारमध्ये सर्वाधिक ३२ लोक उष्माघातमुळे मरण पावले आहेत. बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात १७, अराहमध्ये ६, गया आणि रोहतसमध्ये प्रत्येकी तीन, बक्सर आणि पाटणा येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. ओडिशामधील रुरकेला येथे १० जणांचा मृत्यू झाला. झारखंड आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी पाच जणांचा मृत्यू झाला. तर उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमध्ये एक व्यक्तीचा मृत्यू झाला.
दरम्यान बिहारमधील ४० वर्षीय व्यक्तीचा दिल्लीत उष्माघातामुळे मृत्यू झाला. या व्यक्तीच्या शरीराचे तापमान ४३ अंश सेल्सियस पर्यंत पोहोचले होते, त्यामुळे त्याच्या शरीरातील एक – एक अवयव निकामी होत गेला. शरीराच्या साधारण तापमानापेक्षा हे तापमान १० अंशांनी अधिक होते.
नागपूर ५६ सेल्सियस तापमानाची नोंद चुकीची
नागपूर येथील अंबाझरी रोडवरील रामदास पेठेतील हवामान खात्याच्या केंद्रात ५६ अंश सेल्सियसची नोंद झाल्याच्या ब्रेकींग न्युज झळकल्या आणि अवघ्या महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकला. पण सायंकाळपर्यत ही नोंद चुकीची सदोष यंत्रामुळे झाल्याचा खुलासा हवामान खात्याने केला.