Month: May 2024

‘कळव्यातील अनाधिकृत कार्यालयाचे आव्हाडांनी ट्विट करावे’

आनंद परांजपे यांचे आव्हान ठाणे :  पुणे अपघात प्रकरणी अजित पवार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करुन सक्त कायदेशीर कारवाई करण्याचे व राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडण्याचे आदेश दिले आहेत. असे असतानाही जितेंद्र आव्हाड हे खोटे आरोप करीत आहेत. उलट अजित पवार यांनी आव्हाडांच्यासाठी दोन-दोनदा ठाणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता हे ते विसरलेले दिसतात. जितेंद्र आव्हाड यांनी कळव्याचे अनधिकृत शरद पवार गटाचे कार्यालय पाडण्यासाठी त्यांनी महापालिका आयुक्तांना ट्विट करावे असे आव्हान अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिले आहे. ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  नितेश राणे आणि निलेश राणे यांनी अनेकदा भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे, अंजलीताईंनी ॲक्टिव्हिजमच्या नावावर सनसनाटी आरोप करणे बंद करावे, असेही ते यावेळी म्हणाले. माझा जितेंद्र आव्हाड यांना सवाल आहे की याच अजित पवार साहेब यांनी आपल्यासाठी ज्यावेळी ३५४ गुन्हा दाखल झाला. त्यावेळी आपल्यासाठी देखील ठाणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता, की आपण व्हिडिओ पूर्ण न बघता, चौकशी न करता आमचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ३५४ चा गुन्हा कसा दाखल केलात ? हे आपण विसरलात का ? हरहर महादेवच्या वेळेला ज्यावेळेला तुम्हाला, आम्हाला, माझ्या सर्व कार्यकर्त्यांना वर्तकनगर पोलीस स्टेशनने अचानकपणे नेले होते, त्यावेळी देखील अजित पवार यांनी तत्कालीन पोलीस आयुक्तांना फोन केला होता. मात्र कुठेही केव्हाही अजित पवार यांचा संबध जोडण्याचे काम आव्हाडांकडून केले जात असल्याचेही ते म्हणाले. मनुस्मृतीचे अभ्यासक्रमात येणे चुकीचे लोकसभा निवडणुकीनंतर सर्व मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी यांची बैठक झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ मंत्री माननीय छगन भुजबळ यांनी मतुस्मृतीचा मुद्दा उपस्थित केला होता. पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बोलणार आहेत की, अशाप्रकारे मनुस्मृतीचे अभ्यासक्रमात येणे हे चुकीचे आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचा विरोधच करेल असेही ते म्हणाले.

जिल्ह्यातील ११ हॉटेल आणि बारचे परवाने निलंबित

उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ठाणे : पुण्यात घडलेल्या घटनेनंतर आता ठाण्यातही राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग आली आहे. त्यानुसार त्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी हॉटेल, पब, बारवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ११ हॉटेल आणि बारचे परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने निलंबित केले असल्याची माहिती समोर आली आहे. यात अल्पवयीन मुलांना मद्य देणे, रात्री उशीरापर्यंत बार सुरू असणे अशा विविध कारणांमुळे हे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. पुण्यात झालेल्या घटनेनंतर ठाण्यातही त्याचे पडसाद उमटल्याचे दिसत आहेत. मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्यांच्या विरोधात वाहतूक विभागाकडून कारवाई सुरु झाली आहे. तर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देखील कारवाईचा दट्या दिला जात आहे. भिवंडी आणि ठाण्यात ठिकठिकाणी बेकायदा ढाबे, हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीने मद्य विक्री होत असल्याचा आरोप केला जात आहे. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये विकासकाच्या अल्पवयीन मुलाने पोर्श ही कार भरधाव चालवून दुचाकीवरून जाणाºया तरूण-तरूणीला धडक दिली होती. या धडकेत दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. राज्यात अनेक ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने हॉटेल, बार, रेस्टॉरंट, ढाबे सुरू आहेत. त्यानंतर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देखील कठोर पावले उचलण्यात आली असून अल्पवयीन मुलांना मद्य देणे, रात्री उशीरापर्यंत बार सुरु ठेवणे अशांच्या विरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार मद्य विक्री करण्याचा परवाना असलेल्या परंतु नियमांचे उल्लंघन केलेल्या ११ हॉटेल, बार विरोधात उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत त्यांचे परवाने निलंबित केले आहेत.

पुराची सूचना देणाऱ्या सेन्सरमुळे आपत्ती व्यवस्थापन होणार प्रभावी

महापालिका क्षेत्रातील सहा सेन्सरची देखभाल ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात येणाऱ्या संभाव्य पूर आणि पाणी साठण्याच्या घटना यांची आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि संबंधित यंत्रणा यांना आगावू सूचना देणाऱ्या सहा सेन्सर्सच्या देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे संभाव्य आपत्तीचे व्यवस्थापन प्रभावीपणे करणे शक्य होणार आहे. ठाणा कॉलेज, वृंदावन पंपिंग स्टेशन, साकेत पाइपलाइन, मुंब्रा स्मशानभूमी, हिरानंदानी इस्टेट आणि गायमुख वॉटरफ्रंट या सहा ठिकाणी हे स्वयंचलित सेसर्स काही वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांचा प्रभावी वापर करण्याची सूचना ठाणे पूर धोका नियंत्रण कृती आराखड्यात करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेसाठी कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हार्यन्मेंट अॅण्ड वॉटर (सीईईडब्ल्यू) या वातावरण बदल क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने हा कृती आराखडा तयार केला आहे. पावसाळापूर्व आढावा बैठकीत या सेन्सर्सच्या स्थितीची चर्चा झाली होती. पावसाचे प्रमाण जास्त असल्यास त्यांची सूचना या सेन्सर्सच्या माध्यमातून स्मार्ट सिटीच्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये सूचना दिली जाते. त्यानुसार, मग संबंधित विभाग, प्रभाग समिती, आपत्ती व्यवस्थापन विभाग यांना तातडीने संदेश पाठवले जातात. त्यामुळे, पूर स्थिती, पाणी साठणे आदींचा सामना करणे यंत्रणेला शक्य होते. अतिवृष्टीच्या काळात सखल भागात साठणारे पाणी, भरतीच्या काळात असताना पावसाच्या पाण्याला खाडीत जाण्यापासून होणारा अडथळा, महापालिका क्षेत्रातील पर्जन्य जल वाहिन्यांचे जाळे, नाल्यातील कचऱ्याचा उपद्रव आदींमुळे वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. काही प्रसंगात जीवितहानी होण्याचीही भीती असते. या सर्व स्थितीचा अभ्यास करून ही पूर सदृश स्थिती कशी हाताळायची, त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे याचा कृती आराखडा तयार करण्यात येत आहे.

३१ मेपर्यंत नालेसफाईचे काम पूर्ण

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली नालेसफाईची पाहणी ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात नाले सफाईची कामे वेगाने सुरू आहेत. ही कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार या पाहणी दरम्यान महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला. मंगळवारी झालेल्या या पाहणी दौऱ्यात आनंद नगर येथील नाले सफाईचे काम आयुक्त राव यांनी पाहिले. या नाल्याचा काही भाग मुंबई महापालिका हद्दीत आहे. त्यांच्याशी समन्वय साधून येथील सफाईचे काम होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यांनतर, रेल्वे मार्गाखालून जाणाऱ्या, ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या मागे असलेल्या नाल्याची सफाईचे काम आयुक्त यांनी पाहिले. या नाल्यातून मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्यात आला आहे. रेल्वे मार्गाखाली असलेल्या भागातून सफाई करणे आव्हानात्मक असले तरी ते काम व्यवस्थित केले जावे, अशी सूचना यावेळी त्यांनी दिली. त्यानंतर, वर्तकनगर येथील दोस्ती शेजारील नाला, महात्मा फुले नगर येथील नाला आणि कोरम मॉल लगतचा नाला यांची पाहणी आयुक्त राव यांनी केली. कोरम मॉल लगतच्या नाल्याची मोठा भाग पूर्व द्रुतगती महामार्ग येथे जोडला जातो. तेथेही व्यवस्थित सफाई केली जाईल यांची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. या पाहणी दौऱ्यात, अतिरीक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) तुषार पवार, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, उप नगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी आदी अधिकारी उपस्थित होते.

पनवेलमधील माता-बाल संगोपन केंद्राला मुहूर्त मिळेना

सिडकोकडून भूखंड हस्तांतरास विलंब; आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया रखडली पनवेल ः पनवेल महापालिकेकडून नवीन पनवेल नोड-आसूडगाव हद्दीमध्ये साडेचारशे खाटांचे माता-बाल संगोपन केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे. प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूदही केली आहे, मात्र तांत्रिक अडचणींमुळे रुग्‍णालयाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. सिडकोकडून भूखंड हस्तांतरास विलंब झाल्‍याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडल्‍याचे बोलले जात आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात डॉ नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय वगळता इतर शासकीय रुग्णालय नाही. परिसरात सद्यःस्थितीत सुमारे आठ लाख लोकवस्ती असून दिवसेंदिवस वाढत आहे. पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील प्रसूती केंद्र अपुरे पडत असल्‍याने अनेक गर्भवतींना प्रसूतीसाठी खासगी रुग्णालयात जावे लागते. खांदा वसाहतीलगत आसूडगाव सेक्टर १८ मध्ये भूखंड क्रमांक ८अ आणि ८ ब येथे आठ हजार चौरस मीटरचा भूखंड जिल्हा रुग्णालयासाठी सिडकोने राखीव ठेवला आहे. येथे पनवेल महापालिकेने १०० खाटांचे माता  संगोपन व बाल आरोग्य केंद्र करण्याबाबतचा प्रस्ताव संमत केला होता. सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीमध्ये या ठरावाला तीन वर्षांपूर्वी मंजुरीही देण्यात आली. हा प्रस्ताव आरोग्य संचालनालयाला पाठवण्यात आला होता, त्‍यानंतर त्‍या काही सुधारणा करण्यात आल्‍या. रुग्णालयांच्या खाटांमध्ये आणखी ३५० खाटांची वाढ करण्यात आली आहे. त्‍यानुसार बांधकाम आराखडाही बदलण्यात आला आहे. अतिशय भव्य  स्वरूपात उभारण्यात येणाऱ्या केंद्रात विविध सोयी-सुविधा प्रस्तावित आहेत. हिरकणी या नावाने हा वैद्यकीय उपक्रम साकारला जाणार आहे. गतवर्षी अर्थसंकल्पात प्रशासनाने आरोग्यावर विशेष भर देत माता बाल संगोपन केंद्रासाठी निधीची तरतूदही केली होती. मात्र पनवेल महापालिकेला सिडकोने वेळेत भूखंड हस्तांतरित केला नाही. त्यामुळे हा आरोग्य आणि वैद्यकीय दृष्ट्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडला आहे. काही दिवसांपूर्वीच महापालिकेकडे जागा वर्ग करण्यात आली आहे. मात्र सध्या आचारसंहित लागू असल्याने याबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत.

कल्याण-डोंबिवली परिवहन सेवेचा रौप्य महोत्सव

कल्याण : महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाला २५ वर्षे पूर्ण झाल्याने गणेश घाट आगार या ठिकाणी रौप्यमहोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी परिवहन व्यवस्थापक डॉ. दीपक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आगारात सत्यनारायणाची महापूजा तसेच आरोग्य शिबिर आणि छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी परिवहन कर्मचारी ज्ञानेश्वर रहाणे यांच्या संकल्पनेतून पंचवीस किलोचा केक केडीएमसी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या हस्ते कापण्यात आला. याप्रसंगी आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देताना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिवहनचे अधिकारी कार्यालय अधीक्षक प्रिया निगडे, किशोर घाडी, तृषार्त मुळीक, प्रमोद बागुल, दीपक चौधरी, भारत सांगळे, मच्छिंद्र कणसे, संदीप दलाल, प्रशांत जावळे, गंगाधर राठोड, गौरख पवार तसेच सर्व कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

मिरा-भाईंदरमध्ये पाणीटंचाईचे संकट

भाईंदर : मिरा-भाईंदर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरण आणि एमआयडीसी या दोन्हीकडून पावसाळ्यातील देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी बुधवारी (ता. २९) ते शुक्रवार (ता. ३१) असे पाठोपाठ शटडाऊन घेण्यात येणार आहेत. परिणामी शहरात चार ते पाच दिवस तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे. एकीकडे उन्हाळ्यामुळे आधीच पाण्याची मागणी वाढत असताना होत असलेल्या शटडाऊनमुळे शहरात पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. मिरा-भाईंदर शहराला स्टेम प्राधिकरणाकडून ८६ दशलक्ष लिटर, तर एमआयडीसीकडून ११५ दशलक्ष लिटर पाणी दिले जाते. या दोन्ही स्रोतांकडून सुमारे दोनशे लिटर पाणी मिळत असले तरी शहराची दैनंदिन पाण्याची गरज २२५ ते २३० दशलक्ष लिटर आहे. त्यामुळे नागरिकांना आधीच ३० ते ३५ तासांनी पाणी मिळते. यात एकाही स्रोताकडून पाणीपुरवठा खंडित झाला, तरी शहरात पाणीटंचाई निर्माण होते. आता तर स्टेम, एमआयडीसी या दोघांकडून पावसाळ्यापूर्वीच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी पाठोपाठ शटडाऊन घेण्यात येणार आहेत. स्टेमकडून होणारा पाणीपुरवठा बुधवारी (ता. २९) सकाळी ९ ते गुरुवारी (ता. ३०) सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे, तर एमआयडीसीचा पाणीपुरवठा काही तासांच्या अंतराने म्हणजेच गुरुवारी (ता. ३०) रात्री १२ ते शुक्रवारी (ता. ३१) रात्री बारा वाजेपर्यंत २४ तासांसाठी बंद असणार आहे. यामुळे शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण होणार आहे. स्टेम प्राधिकरणाचा पाण्याचा उद्‍भव शहाड, टेमघर येथे आहे, तर एमआयडीसीचा पाण्याचा उद्‍भव बारवी धरण आहे. या दोन्ही स्रोतांपासून मिरा-भाईंदर शहर हे सुमारे ८० किमी लांब असून पाणीपुरवठ्यासाठी तेवढ्या लांबीची जलवाहिनी अंथरण्यात आली आहे. त्यामुळे दोघांपैकी एकाचा पाणीपुरवठा खंडित झाला, तरी जलवाहिनी पाण्याने पूर्ण भरून पाण्याचा दाब पूर्ववत होण्यासाठी दोन दिवस लागतात. त्यामुळे दोन ते तीन दिवस नागरिकांना पाणी कमी दाबाने व उशिराने तर मिळतेच; शिवाय पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडून ३० ते ३५ तासांवरचा पाणीपुरवठा ६० ते ७० तासांवर जातो. आता दोघेही लागोपाठ शटडाऊन घेणार आहेत. त्यामुळे नागरिकांना चार ते पाच दिवस तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भीती आहे. खासगी टँकरचे उखळ पांढरे तीव्र पाणीटंचाईचा खासगी टँकरमालकांना मात्र चांगलाच लाभ होणार आहे. शहरात पाचशे ते सातशे लिटर पाणी देणारे छोटे, तसेच दहा हजार लिटर पाणी देणारे टँकर कार्यरत आहेत. शिवाय या पाण्याची गुणवत्ता काय असते, याबाबतही शंका व्यक्त होत असते; मात्र शहरातील पाणीटंचाईदरम्यान हेच पाणी घेण्यावाचून नागरिकांपुढे दुसरा पर्याय नसणार आहे. विविध कारणाने शटडाऊन रखडले वास्तविक एमआयडीसीकडून घेण्यात येणारा शटडाऊन गेल्या आठवड्यात शुक्रवारी घेण्यात येणार होता; मात्र आयत्या वेळेस तो रद्द करण्यात येऊन या आठवड्यात घेण्यात येणार आहे. एमआयडीसीचा शटडाऊन गेल्या आठवड्यात झाला असता, तर नागरिकांचा त्रास काही प्रमाणात कमी झाला असता. दुसरीकडे स्टेम प्राधिकरणाचा गेल्या दोन महिन्यांपासूनचा शटडाऊन घेण्याचा प्रस्ताव होता. मात्र काही ना काही कारणांमुळे तो पुढे ढकलण्यात आला. आता हे दोन्ही शटडाऊन एकाच आठवड्यात काही तासांच्या अंतराने एका पाठोपाठ घेण्यात येत आहेत.

मुंबईत २१ जूनला डाक अदालतीचे आयोजन

तक्रार ७ जून २०२४ पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी-सुनिल थळकर अशोक गायकवाड रायगड : मुख्य पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई येथे २१ जून रोजी डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून ७ जून २०२४ पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी, असे आवाहन अधीक्षक डाकघर रायगड विभाग सुनिल थळकर यांनी केले आहे. मुख्य पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, अनेएक्स बिल्डिंग, जीपीओ कॉम्प्लेक्स, चौथा माळा, मुंबई यांच्या कार्यालया‌द्वारे दि.२१ जून २०२४ रोजी, दुपारी ३.०० वाजता १२७ वी डाक अदालत आयोजीत करण्यात आली आहे. इछुक ग्राहकांनी आपली तक्रार २ प्रतीत असिस्टंट डायरेक्टर पोस्टल सर्विसेस (पीजी) अँड सेक्रेटरी, डाक अदालत ०/० मुख्य पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, अनेएक्स बिल्डिंग, जीपीओ कॉम्प्लेक्स चौथा माळा, मुंबई ४००००१ यांच्याकडे दि.०७ जून २०२४ पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी, यामध्ये महाराष्ट्र सर्कल विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रार/ समस्या ज्याचे निवारण ६ आठवडा कालावधीत झालेले नाही, अशा टपाल, स्पीडपोस्ट, काऊंटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर संबधित तक्रारी विचारात घेतल्या जातील.तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हु‌द्दा इ. असणे आवश्यक आहे., असे आवाहन अधीक्षक डाकघर रायगड विभाग सुनिल थळकर यांनी केले आहे.

साडेचार लाख रुपयांना बाळाची विक्री

तृतीयपंथीयांसह सहा जणांना अटक, आरोपींमध्ये मुलाच्या आई-वडिलांचाही समावेश मुंबई : दीड वर्षाच्या मुलाची साडेचार लाख रुपयांना विक्री केल्याच्या आरोपाप्रकरणी दोन तृतीयपंथीयांसह सहा जणांना पोलिसांनी अटक केली. आरोपीमध्ये मुलाच्या आई-वडिलांचाही समावेश आहे. याप्रकरणी डीएन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी स्वतः तक्रार केली असून त्यांच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात भादंवि कलम ३७०, ३४ सह अल्पवयीन न्याय (काळजी व संरक्षण) कायदा कलम ८० व ८१ अंतर्गत सहाजणांविरोधात डीएन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सीमा खान (३२) या प्रकरणातील तक्रारदार आहेत. तक्रारीनुसार, हुसैन शेख या एक वर्ष सात महिन्यांच्या मुलाची विक्री करण्यात आली. मुलाची आई नाजमीन शेख व वडील मोहम्मद शेख मालाड मालवणी परिसारीतल अब्दुल हमीद रोड परिसरातील वास्तव्यास आहेत. या दाम्पत्याने स्वतः आपल्या बाळाची विक्री केली. त्यासाठी अंधेरी पश्चिम इंदिरा नगर येथील तृतीयपंथी सायबा अन्सारी, त्याच परिसरात राहणारी राबिया अन्सारी व सकीना बानू शेख यांच्या मध्यस्थीने या बाळाची विक्री करण्यात आली. साकीना शेख ही या दाम्पत्याची परिचित आहे. सायबा अन्सारीच्या परिचयातून ठाण्यातील इंद्रदीप ऊर्फ इंदर व्हटवार (४३) याला बाळाची विक्री करण्यात आली. व्हटवार हा चांगल्या कुटुंबातील असून समलिंगी आहे. त्याला मुलगा दत्तक घ्यायचा होता. वैद्यकीय खर्चासह चार लाख ६५ हजार रुपयांना बाळाची विक्री करण्यात आली. आरोपींच्या तावडीतून बाळाची सुटका करण्यात आली असून त्याला सध्या अंधेरी पश्चिम येथील सेंट कॅफरीन सुरक्षागृहात ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. अपहरणाच्या बनावामुळे बिंग फुलले मुलाची आत्या घरी आली असता मुलगा दिसून आला नाही. अखेर तिने भावाला विचारले असता एका व्यावायिकाने त्याचे अपहरण केल्याची खोटी माहिती सांगितली होती. त्यानंतर मुलाच्या आत्याने तात्काळ भावाला व त्याच्या पत्नीला मालवणी पोलीस ठाण्यात घेऊन गेली होती. त्यावेळी त्यांनी जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी घेऊन गेल्याचे सांगून वेळ मारून नेली. पण त्याने बनवलेल्या कथेमध्ये अनेक चुका दिसू लागल्या त्यातून हा संपूर्ण प्रकार उघड झाला. आई-वडिलांनीच मुलांची विक्री केल्याची ही पहिली घटना नाही.

कल्याण-सीएसएमटी वातानुकूलित लोकलमधील शीत यंत्रणा बंद

प्रवासी उकाडा, घामाने हैराण कल्याण : कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकलमधील काही डब्यांमधील वातानुकूलित यंत्रणा दोन दिवसांपासून बंद असल्याने प्रवासी लोकलच्या डब्यात बटाट्यासारखे उकडून निघत आहेत. उकाड्यामुळे बहुतांशी प्रवासी वातानुकूलित लोकलला आता पसंती देत आहेत. डब्यात घुसल्यानंंतर काही क्षणात प्रवाशांना डब्यातील वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याचे लक्षात आल्यावर प्रवाशांचा संताप होत आहे. अगोदरचा उकाड्याने नागरिकांचा घामटा निघाला आहे. सकाळची वेळ असली तरी उकाडा प्रवाशांची पाठ सोडत नाही. सकाळची वेळ असूनही घाम पुसून पुसून प्रवाशांंचे रुमाल ओलेचिंब होत आहेत. अशा परिस्थितीत वातानुकूलित लोकलमधून मस्त समाधानाने प्रवास करून या विचाराने या लोकलमध्ये चढून मुंबईपर्यंतचा प्रवास करणारे प्रवासी लोकलमधील वातानुकूलन यंत्रणा बंद राहत असल्याने संताप व्यक्त करत आहेत. वातानुकूलित लोकलमधील शीत यंत्रणा सुरू आहे की नाही हे लोकल सुरू करण्यापूर्वी कारशेडमध्ये तपासले जाते की नाही, असे प्रश्न प्रवासी उपस्थित करत आहेत. कल्याणमधून सकाळी सुटणारी वातानुकूलित लोकल डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक पाचवर सकाळी नऊ वाजता येते. ही लोकल मुंबईत कार्यालयीन वेळेपूर्वी पोहोचत असल्याने बहुतांशी प्रवाशांची या लोकलला पसंती असते. गेल्या दोन दिवसांपासून प्रवासी या लोकलमध्ये चढत आहेत. लोकलमध्ये चढल्यानंतर काही डब्यांमधील वातानुकूलन यंत्रणा बंद असल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास येत आहे. शीत यंत्रणा बंद असेल तर प्रवाशांना डब्यामध्ये सूचना करणारे एक लाल बटन आहे. ते दाबल्यानंतर मोटरमन, गार्डकडून त्याची दखल घेतली जाते. हे सूचना बटन दाबूनही त्याची मोटारमन, गार्डकडून दखल घेतली जात नाही, असे डोंबिवलीतील एक प्रवासी तुषार साठे यांनी सांगितले. एकदा वातानुकूलित लोकलमध्ये चढल्यानंंतर पुन्हा ती लोकल सोडून दुसऱ्या लोकलमध्ये चढणे प्रवाशांना शक्य होत नाही. त्यामुळे कोंडमारा करत, गुदमरत प्रवासी वातानुकूलित लोकलमधून प्रवास करत आहेत. अनेक प्रवाशांंना अती उकाड्यामुळे डब्यात अस्वस्थ वाटू लागले की ते पुढील रेल्वे स्थानकात उतरत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या. प्रवासी वातानुकूलित लोकलचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न करतात. पण दरवाजेही उघडत नसल्याने जीव गुदमरत प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. मध्य रेल्वे मार्गावरील प्रवासी सोशिक आहेत, असे समजून वातानुकूलित लोकलमधील बिघाड नाही काढला तरी चालेल असा विचार रेल्वे अधिकाऱ्यांनी करू नये. अन्यथा, रेल्वे प्रवाशांच्या उद्रेकाला एक दिवस रेल्वे प्रशासनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रवाशांनी दिला आहे.